Thu, Jan 23, 2020 05:39होमपेज › Konkan › कंटेनरखाली चिरडून दोघे जागीच ठार

कंटेनरखाली चिरडून दोघे जागीच ठार

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 14 2018 11:28PMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवाण खवटी रेल्वे स्थानकासमोर शनिवार सकाळी 8.30 वा. सुमारास कंटेनर तसेच दुचाकीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कंटेनरच्या चाकाखाली सापडून 23 वर्षीय  दुचाकीस्वार तरुणासह अवघ्या 7 वर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंपनीमुळे  झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत राष्ट्रीय महामार्ग 6 तास रोखून धरला. 

शनिवारी सकाळी 8.30 वा. च्या सुमारास खवटी सातपानेवाडी येथील रहिवासी विशाल विश्‍वास मोरे (वय 23) हा त्याचा मामेभाऊ आरूष जितेंद्र वाडकर (7, रा. मोरगिरी, ता. पोलादपूर, जि. रायगड) याला दुचाकीवरून (एमएच 06 बीजे  5311) खवटी येथून खेडच्या दिशेने जात होता.     

दिवाणखवटी रेल्वे स्थानकासमोर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरचा (एमएच 46 एआय 5858) चालक नानासो मालासो जरे (रा. सोलापूर) याने चौपदरीकरणाच्या कामात बांधलेल्या मात्र उघड्या मोरीमध्ये कंटेनरचे चाक मोरीत जाऊ नये म्हणून कंटेनर अचानक वळवला. दरम्यान, कंटेनर अचानक वळल्याने  विशाल मोरेची दुचाकी कंटेनरवर धडकली. अपघातानंतर विशाल तसेच आरूष हे कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताला महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कल्याण टोल कंपनीचा गलथानपणा जबाबदार असल्याची बाब पुढे आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कंपनी मालक किंवा व्यवस्थापक  घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

घटनास्थळी पोहोचलेले कशेडी वाहतूक शाखेचे पोलिस व खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, तो अपयशी ठरत होता. संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर ‘रास्ता रोको’ सुरू केला.

ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, तहसीलदार अमोल कदम, आ. संजय कदम, जि. प. बांधकाम सभापती चंद्रकांत कदम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, अपघातानंतर चार तास उलटूनही कल्याण टोल कंपनीचे अधिकारी अथवा कर्मचारी कोणीच पोलिस व प्रशासनाकडून विनंती करूनही घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर संतप्त जमावाने कंटेनरच्या काचा फोडल्या तसेच नजीकच असलेल्या कल्याण टोल कंपनीच्या एका कार्यालयाची तोडफोड केली. 

शुभकार्यातच मोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अपघातात मृत्यू झालेल्या विशाल मोरे याचा महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता तर त्याच्या बहिणीचे येत्या पंधरा दिवसांत लग्न होणार होते. परंतु, त्याचा या अपघातात मृत्यू झालाच, सोबत त्याचा सात वर्षीय मामेभाऊ आरूष याचाही करुण अंत झाल्याने शुभकार्यातच मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.