Tue, Nov 13, 2018 04:45होमपेज › Konkan › खारफुटीच्या ‘हिरव्या भिंती’ला जनजागृतीने ‘मजबुती’

खारफुटीच्या ‘हिरव्या भिंती’ला जनजागृतीने ‘मजबुती’

Published On: Feb 18 2018 1:59AM | Last Updated: Feb 17 2018 10:58PMरत्नागिरी : प्रतिनिधी

किनार्‍यांचे नैसर्गिक संरक्षण करणार्‍या खारफुटीची हिरवी भिंत वाचविण्याच्या चळवळीला यश आले आहे. कोकण किनारपट्टीच्या परिघातील खारफुटीच्या विस्तारात वाढ झाली आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये याबाबत करण्यात आलेल्या जागृतीनंतर खारफुटी जंगलात 102 चौरस कि.मी.ने वाढ झाली आहे. यामुळे या वनक्षेत्रात महाराष्ट्र देशात या  क्षेत्रात अग्रणी ठरले आहे. अलीकडेच केंद्राच्या पर्यावरण विभागाने केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. कोकणातील मुंबईसह पाचही जिल्ह्यांत खारफुटीची जंगले आहेत. मात्र, जागेच्या हव्यासापायी या खारफुटीची मोठ्या प्रमाणात तोड सुरू होती. यामुळे किनारपट्टीची धूप होण्याबरोबरच सागरी पर्यावरणावर भीतीची छाया होती. 

खारफुटीची मुळे ही माशांच्या प्रजननाची केंद्र मानली जातात. मात्र, या झाडांच्या तोडीमुळे मत्स्य प्रजननही अडचणीत येण्याची भीती होती. अलीकडील काळात खारफुटी तोडीचा प्रतिबंध व्हावा, म्हणून जागृती होऊ लागली आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.