Fri, Feb 22, 2019 05:59होमपेज › Konkan › जलसमाधीपूर्वीच केंद्रे प्रकल्पग्रस्त ताब्यात

जलसमाधीपूर्वीच केंद्रे प्रकल्पग्रस्त ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

केंद्रे ब्रुद्रुक व खुर्द येथील प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांना जलसमाधी घेण्याअगोदर पोलिसांनी अटक  करून पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी  पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सर्व खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक गावात 5 डिसेंबरपर्यंत आयोजित केली जाईल, असे आश्‍वासन दिल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले. 

20 नोव्हेंबरपासून केंद्रे गावी तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या यादीत नावे समाविष्ट करावी, नागरी सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण केल्या नाहीत त्याची पूर्तता करावी,  हा गाव आयनोडे-हेवाळे ग्रा.पं.कडे वर्ग करावा आदी मागण्यांसाठी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते; पण या उपोषणकर्त्यार्ंची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी घेणार, असा इशारा दिला होता. तर अप्पर जिल्हाधिकारी यांनी मंगळवार  28 नोव्हेंबर रोजी ओरोस येथे आपल्या मागण्यासंदर्भात बैठक आयोजित केली आहे, यामुळे उपोषण व जलसमाधी घेऊ नये, यासाठी लेखीपत्रदेखील दिले होते. पण प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जलसमाधी घेण्याअगोदरच त्यांना उपोषणस्थळी ताब्यात घेत अटक केली. 

पालकमंत्र्यांची उदासिनता : संजय नाईक

केंद्रे ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचे नेतृत्व तिलारी संघर्ष समिती सचिव संजय नाईक करत होते. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. गेले पाच दिवस प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु पालकमंत्र्यांना उपोषणस्थळी भेट देणे जमले नाही. किंबहुना, आमचा भ्रमणध्वनी उचलण्याची तसदीही घेतली नाही. जे पालकमंत्री जिल्ह्यातील क्रिकेट असोसिएशनचे उद्घाटन करतात पण त्यांना उपोषणस्थळी येऊन भेट देण्यासाठी वेळ मिळत नाही, हे जतनेचे दुर्भाग्य आहे,असेही नाईक म्हणाले.