Sun, May 19, 2019 11:57
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › राजापुरात पुन्हा आढळला कातळशिल्पांचा खजिना

राजापुरात पुन्हा आढळला कातळशिल्पांचा खजिना

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 22 2018 10:34PMराजापूर : प्रतिनिधी

कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणार्‍या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे तसेच रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली. नव्याने सापडलेल्या कातळशिल्प खजिन्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरूपाची शिल्पे आढळली आहेत.

कोकणातील पर्यटनाच्या नकाशावर येत असलेल्या कातळशिल्प कलेची दखल घेत राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात घेतली आहे. कातळशिल्पांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेतानाच 24 कोटी निधीची तरतूद प्रथमच केली आहे. त्यामुळे कातळशिल्प कलेचे महत्त्व अधिक गडद झाले आहे. कोकणातील पर्यटनाचा विचार करता कातळशिल्पांमुळे कोकणातील पर्यटन ठिकाणांमध्ये भर पडली आहे. कोकणात मागील काही वर्षांत विविध ठिकाणी कातळशिल्पे सापडली आहेत. त्यात राजापूर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील अनेक गावांत कातळशिल्पे यापूर्वीही सापडली होती. त्याचे शोधन धनंजय मराठे व सुधीर रिसबूड यांच्या प्रयत्नाने झाले होते.

अर्थसंकल्पात कातळशिल्पांसाठी निधीची तरतूद

अलीकडील काही वर्षांपासून राजापूर तालुक्यात कुठे ना कुठे कातळशिल्पे आढळून येत आहेत. राज्य शासनाने पर्यटनाच्या द‍ृष्टीने या कलेला प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पात  कातळशिल्पांचे जतन, संरक्षण व संवर्धनासाठी निधीची तरतूद केली आहे.

तालुक्याच्या विविध भागांत आणखी कातळशिल्पे सापडतील अशी शक्यता दाट बनल्याने धनंजय मराठे व सुधीर रिसबूड यांनी आपली शोधमोहीम सुरुच ठेवली  होती. या मोहिमेदरम्यान त्यांना तालुक्यातील बाकाळे, आंगले व रानतळे या ठिकाणी कातळशिल्पे असल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता तिन्ही ठिकाणी कातळशिल्पे आढळून आली. 

याबाबत बाकाळे येथील मंदार परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे मानवाकृती कातळशिल्प आढळून आले आहे. रानतळे येथे एक शिंगी गेंड्याचे शिल्प सापडले असून ते नऊ फूट लांब तर आठ फूट रुंद आहे. आंगले येथील कातळशिल्प हे शशिकांत काकीर्डे यांच्या जागेत असून ते मानवाकृती चौकोनी स्वरुपाचे आहे. त्याची लांबी व रुंदी ही 17 फुटांची असल्याची माहिती कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे यांनी दिली.