Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Konkan › कातळशिल्पांचे होणार संवर्धन

कातळशिल्पांचे होणार संवर्धन

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 11:05PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी नव्याने संशोधित करण्यात आलेल्या कातळशिल्पांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रादेेशिक पर्यटन योजनेतून 2018-2019 या आर्थिक वर्षासाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती ‘एमटीडीसी’चे विभागीय व्यस्थापक अभिषेक चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने (एमटीडीसी) पर्यटन स्थळांचा दर्जा, तेथे येणार्‍या पर्यटकांची संख्या व विकासाला असणारा वाव लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची वर्गवारी ‘अ’, ‘ब’, ‘क’ या श्रेणीमध्ये केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेली स्थळे ‘अ’ श्रेणीमध्ये, राज्यस्तरावरील महत्त्वाची प्रसिद्ध पर्यटनस्थळे ‘ब’ श्रेणीमध्ये तर जिल्हास्तरावर महत्त्व असलेली स्थळे ‘क’ श्रेणीमध्ये निर्देशित करण्यात आली आहेत. यामध्ये 6 स्थळे ‘ब’ तर 69 स्थळे ‘क’ श्रेणीमध्ये जाहीर करण्यात आली आहेत. या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देताना  कार्यान्वयीन यंत्रणेमार्फत तेथील विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

 राजापूर येथील कातळ शिल्पांचा शोध रत्नागिरी येथील हौशी अभ्यासकांनी लावला आहे. या कातळ शिल्पांना पर्यटनांतर्गत प्रसिद्धी मिळण्यासाठी महामंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या कातळ शिल्पांची माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावरही  उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  कातळशिल्पे खासगी 

जमिनीमध्ये असल्याने या शिल्पांपर्यंत पोहोचण्याचा जोडरस्ते व माहितीपर फलक उपलब्ध करुन देणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत 2018-19 साठी कातळ शिल्पांच्या संवर्धन व उपाययोजनांसाठी सुमारे 20 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कातळ शिल्पांच्या ठिकाणी संरक्षक भिंत (तारेचे कंपाऊंड), माहिती कक्ष, मार्गदर्शक, रस्ते, पाणी आणि  स्वच्छतागृहाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.