Thu, Jul 18, 2019 20:46होमपेज › Konkan › भाविक व वर्षा पर्यटकांचे श्रद्धास्थान श्री देव बैरागी कासारटाका

भाविक व वर्षा पर्यटकांचे श्रद्धास्थान श्री देव बैरागी कासारटाका

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 10:31PMमालवण : महेश कदम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व भक्‍तांच्या नवसाला पावणारा पाषाणरुपी परमेश्‍वर म्हणजे बैरागी कासारटाका. आषाढ महिन्यात नवस फेडण्याच्या उद्देशाने वनभोजनासाठी कासारटाक्याला स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीही एकच गर्दी होते. पावसामुळे येथील धबधबे आणि इतर  जलस्त्रोत प्रवाहित होऊ लागल्यानंतर  भक्‍तांच्या आणि पर्यटकांच्या गर्दीने चौके कासारटाका परिसर  हाऊसफुल्ल होतो. 

मालवण शहरापासून सुमारे 11 कि.मी.वर चौके-धामापूर मार्गावर गोड्याच्यावाडी नजीक निसर्गाच्या कुशीत रस्त्याकडेला असलेले  देवस्थान तसेच धामापूर तलावानजीक असलेले देवस्थान हे दोन्ही देव कासारटाक्याची देवस्थाने असून याठिकाणी पावसाळ्यात  नवस फेडण्यासाठी आणि नवस करण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भाविकांची मोठी गर्दी असते. हिरवीगार वनराई, त्यात खळखळत वाहणारे नदीनाले आणि येथील ओहोळावर वसलेले एक घुमटीवजा मंदिर म्हणजे बैरागी कासारटाका होय.  या कासारटाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की आपली इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासारटाक्याला   नवस फेड करुन तेथेच जेवण बनवितीत.  कारण भाविकांना येथेच जेवण बनवून देवाला नैवद्य अर्पण केल्याशिवाय नवस फेडीची पूर्तता होत नाही, असे मानले जाते.विशेष म्हणजे  पुरुष मंडळीच तेथील नैसर्गिक ओहोळाच्या पाण्यावर हे  अन्‍न शिजवितात. येथे शिजविलेल्या अन्‍नाची चव न्यारीच असते. शिजविलेले अन्‍न घरी नेऊ नये, असे सांगितले जाते. याठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा. पण आता पुरुषांबरोबरच महिलाही मोठया संख्येने येथे उपस्थिती दर्शवित आहेत.कासारटाक्याच्या ओहोळात जेवणापूर्वी मनसोक्‍त डुंबणे ही इथे येणार्‍या भाविकांची प्रथम पसंती असते. रोजच्या ताण-तणावाच्या जीवनापासून अलिप्त रहाणारे, रुक्ष जीवन विसरायला लावणारे असेच हे ठिकाण आहे. मालवण तालुक्यातूनच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हयासह, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक येथून दरवर्षी हजारो भाविक कासारटक्याला मटणाचा नैवेद्य दाखविण्यासाठी येथे येतात. श्रावण  महिना  वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते. मात्र, आषाढ महिन्यात तर येथे रविवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसात भाविकांची जत्राच भरलेली  दिसून येते. 

 राजकीय पुढारी, भाविकांची वर्दळ

श्री देव बैरागी कासारटाका जसा सर्वसामान्या भक्‍तांना पावतो तसाच तो राजकीय नेते मंडळीनाही पावतो. यामुळे नवस फेड करणार्‍या भाविकांमध्ये राजकारणी मंडळांचा अधिक भरणा असतो. विशेषतः निवडणूक काळात ही राजकीय मंडळी श्री देव बैरागी कासरटाक्याला आवर्जुन साकडे घालतात. अर्थात इच्छित मनोकामना पूर्ण होताच येणार्‍या पावसाळ्यात ही नवसे फेड करतात. अशा राजकीय नवसफेड कार्यक्रमाला  त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक असे सगळेच उपस्थित रहात असल्याने कासारटाक्यात जणू गावजेवण कार्यक्रम होतो. जिल्ह्यातील काही वजनदार व प्रस्थापित नेते मंडळी तर दरवर्षी येथे कोंबडा, बकर्‍याचा बळी देऊन आपली राजकीय कारकिर्द सुखनैव चालावी, यासाठी कासरटाक्याला साकडे घालतात.

पोलिस बंदोबस्ताची व पर्यावरण रक्षणाची गरज
गेल्या काही वर्षांपासून कासारटाका येथे भाविकांबरोबर वर्षा पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे. येथे  मांसाहारी जेवणा बरोबरच मदिरा प्राशनही केले जात असल्याने अनेक वेळा तरुणांच्या गटात वादावादीचे व हाणामाराचे प्रसंग घडू लागले आहेत. यामुळे निसर्गरम्य व धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या या ठिकाणाची नाहक बदनामी होत आहे. हे प्रकार टाळण्यासाठी प्रामुख्याने पावसाळी हंगामात या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.  त्याच बरोबर या ठिकाणी जेवणावळीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अनेक भाविक उरलेले अन्‍न, प्लास्टीकचे कंटेनर, पिशव्या, मद्याच्या बॉटल, पाण्याच्या बॉटल तेथेच टाकून देतात. याचा नाहक त्रास परिसरातील रहिवासी व जनावरांना सहन करावा लागतो. शिवाय या घटकांमुळे येथील पर्यावरणाची हानी होते. याबाबतही योग्य नियोजनाची गरज आहे.

कसे जाल कासारटाका पर्यटनाला
मालवण ते कासारटाका सुमारे 18 कि.मी., कणकवली, कसाल, कट्टा ,येथून चौके कुडाळ मार्गावर रस्त्यालागत सुमारे 40 कि.मी. कुडाळ येथून नेरूरपार, धामापूर, काळसे,  कासारटाका सुमारे12 कि.मी.