Wed, Jun 03, 2020 18:46होमपेज › Konkan › स्नेहमेळाव्यात एकवटला सकल मराठा समाज 

स्नेहमेळाव्यात एकवटला सकल मराठा समाज 

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 10:46PM

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

शिस्तबध्द नियोजन, उत्स्फूर्त सहभागातून झालेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची उपस्थिती यातून सकल मराठा समाजाचा स्नेहमेळावा लक्षवेधी ठरला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा पोवाड्यातून मांडण्यात आली. त्याचबरोबर मराठा एक होऊन समाजातील अनिष्ट प्रवृत्ती रोखण्यासाठी कटिबध्द असल्याचा संकल्प शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्यात करण्यात आला. 

  कणकवली तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने येथील मराठा मंडळ सभागृहात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोपर्डीत हत्या झालेल्या मराठा समाजाच्या भगिनीला आदरांजली वाहण्यात आली. मेळाव्यात समाजबांधवांनी प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले. समाजातील मुला-मुलींनीही नृत्यकला, वक्‍तृत्व कलेचे सादरीकरण केले. अनेक मुला-मुलींनी पोवाडेही सादर केले. त्याचबरोबर बेळगाव येथील शिवशाहीर शिवाजी चंदगडकर यांच्या पथकाने छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराजांचे चरित्र गाऊन जीवनगाथा उलगडली. प्रेरणादायक असा पोवाडा प्रेक्षकांचे स्फुल्लींग चेतवणारा ठरला. 

  स्नेहमेळाव्यातील शिस्तबद्धता, क्रांती मोर्चाप्रमाणेच प्रेरणादायी होती. मेळाव्यास आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतिश सावंत,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे  माजी सभापती तुळशीदास रावराणे, डॉ. च.फ.राणे,  एस.टी. सावंत, योगेश सावंत, अ‍ॅड. विलास परब, सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, सुहास सावंत, कणकवलीच्या नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड, सौ. कल्पना सावंत, सौ. स्वाती राणे, बाबू सावंत,संदीप राणे, हेमंत सावंत, बबलू सावंत, आबा दुखंडे, सौ. प्रणिता पाताडे, शेखर राणे, सोनू सावंत, भाई परब आदी उपस्थित होते. 
कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि मोठेपणाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेऊन मेळावा यशस्वी केला. उपस्थित हजारो समाजबांधव आणि भगिनींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासुन शेवटपर्यंत शिस्तीचे अनुकरण केले. या देखण्या स्नेहमेळाव्याने मराठा समाजातील एकोपा आणखीनच वाढला. समाजातील प्रेम, आदरभाव, आपुलकी निर्माण करण्यासाठी हा मेळावा महत्त्वपुर्ण ठरला असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्‍त करण्यात आली.   समाजातील बुजुर्ग आणि जाणकार मंडळींचीही मेळाव्यास लाभलेली उपस्थिती नव्याने कार्यरत झालेल्या तरुण मराठा समाज कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरली.