होमपेज › Konkan › कणकवली विकास आघाडीची सर्वच पक्षांना धास्ती!

कणकवली विकास आघाडीची सर्वच पक्षांना धास्ती!

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 9:48PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली विकास आघाडी अर्थात गावविकास पॅनेलने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने या आघाडीची धास्ती सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी घेतली आहे. या आघाडीचा फटका कोणत्या कोणत्या प्रभागात कोणाला बसणार याची गणिते विद्यमान नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी घालत आहे. या आघाडीने सुरूवातीला महाराष्ट्र स्वाभिमान, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांशी आपला प्रस्ताव ठेवून चर्चा केली होती. मात्र, त्यामध्ये कोणताही निर्णय न झाल्याने अखेर कणकवली विकास आघाडी आता ‘एकला चलो’ च्या भूमिकेत आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र स्वाभिमान, शिवसेना,भाजप, काँगे्रस या प्रमुख पक्षांबरोबच यावेळी प्रथमच कणकवली गावविकास आघाडी उतरली आहे. अनेक मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक सत्ताधारी राजकीय पक्षांकडून न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कणकवलीतील मूळ राणे मंडळी आणि इतर मूळ रहिवाशांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आहे. कणकवलीच्या अनेक प्रभागात या मंडळींचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष आणि  पाच नगरसेवकांच्या जागा कणकवली विकास आघाडी लढवेल असा प्रस्ताव ठेवून या आघाडीने शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षांशी चर्चा केली होती. मात्र, या प्रस्तावाबाबत अपेक्षित निर्णय न मिळाल्याने अखेर कणकवली विकास आघाडीने स्वबळाचा नारा दिला आहे. 

दरम्यान, या आघाडीचे अनेक  प्रभागात प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या आघाडीची धास्ती घेतली आहे. या आघाडीचा फटका कुठल्या कुठल्या प्रभागात बसेल याची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. अर्थात उमेदवार कोण असणार आहेत यावरही बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. या कणकवली विकास आघाडीमुळे मत विभागणीची भितीही व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने ‘मेक ओव्हर’ करण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार त्या त्या पक्षीय स्तरावर सुरू आहे. गुरूवार, शुक्रवारी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार घोषित होणार असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.