Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Konkan › दगडी पुलांच्या सुरक्षेची अखेर शासनाला जाग!

दगडी पुलांच्या सुरक्षेची अखेर शासनाला जाग!

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 9:06PMकणकवली : अजित सावंत

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-सावित्री नदीवरील जुना दगडी बांधकामातील  कमानी पूल अ‍ॅागस्ट 2016 च्या पावसाळ्यातील महापुरात वाहून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली होती. त्या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता शासनाने नेमलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या एक सदस्यीय आयोगाने सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे दुर्घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानंतर आता राज्य शासनाला रस्त्यांवरील दगडी बांधकामातील कमानी पुलांच्या देखभाल दुरूस्ती व सुरक्षेबाबत करावयाच्या उपायोजनांची आठवण झाली आहे.  तीसुध्दा सावित्री पूल दुर्घटनेच्या दोन वर्षांनी आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर जवळपास 20 दिवसांनी हे विशेष.राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, महानगरपालिका आणि नगरपालिका अशा  विविध अभीकरणांच्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर जुने कमानी पध्दतीचे बांधकाम असलेले ब्रिटीशकालीन आणि स्वातंत्र्योत्तर पूल अस्तित्वात आहेत. या जुन्या पुलांपैकी बहुतांशी पूल दगडी बांधकामील असून काही पूल काँक्रिटच्या बांधकामात आहेत. सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांचा एक सदस्यीय आयोग दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमला होता. या आयोगाने शासनाला दगडी पुलांच्या देखभाल दुरूस्ती व सुरक्षेबाबत उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. त्यानंतर आता शासन जागे झाले असून या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सा.बां. विभागाने दिले आहेत. खरे तर गतवर्षीच या पुलांच्या दुर्घटनेसाठी किंवा आयोगाने अहवाल दिल्यानंतर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक होते. मात्र, उशिरा का होईना मायबाप शासन जागे झाले आहे. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर या उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

यामध्ये प्रत्येक पावसाळ्यानंतर कमाल पूर पातळीची नोंद ठेवून ती नोंद वहित घेण्याबरोबरच पुलांच्या स्तंभ/अंत्यपादावर कमाल पूर पातळी वर्षासह रंगविणे आवश्यक आहे. तसेच महत्तम पूर पातळीमध्ये वाढ झाल्यास स्थानिक प्रशासनास कळवून अभिलेखे अद्ययावत करावयाचे आहेत. पुलांच्या बांधकामांवर उगविणार्‍या वनस्पती, झाडे मुळासकट काढून टाकण्यात यावीत. ती परत उगविणार नाहीत यासाठी रासायनिक द्रव्य किंवा इतर पर्यायाचा वापर करावा. जुन्या पुलांवर रात्रीची दृष्यमानता वाढविण्यासाठी प्रकाश योजनेची व्यवस्था करावी. दोन्ही बाजूस किमान सौरउर्जेवरील ब्लिंकर्स आणि पुलावरील रस्त्याच्या दोन्ही कडेला तसेच दुपदरी पुलांच्या मध्यरेषेवरसुध्दा रिफ्लेक्टीव कॅट आईज अथवा रोडस्टडस् बसवावेत. पुलांच्या जोड रस्त्यावर पूल सुरू होण्यापूर्वी आवश्यकतेनुसार एक पदरी, अरूंद पूल, वेग मर्यादा, बुडीत पूल अशा स्वरूपाचे सूचना फलक कायमस्वरूपी लावण्यात यावेत. पुलांवरील वाहनाचा वेग मर्यादीत राहण्यासाठी जोडरस्त्यांवर रम्बलर स्ट्रीप्स बसवून पूर्वसूचना देणोर सूचनाफलक बसवावेत, पावसाळ्यात पुरामध्ये संपूर्ण परिस्थिती, पावसाचा कालावधी, पुराची पातळी याचा आढावा घेवून वाहतूक थांबविण्याबाबत सक्षम अधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा. पोलिसांनीही  व प्राधिकरणने गस्त घालावी. भारतीय रस्ते महासभेच्या सूचनेनुसार अशा पुलांची दर तीन ते पाच वर्षांनी तपासणी करावी. पुलांच्या दगडी बांधकामामध्ये पोकळी निर्माण झाल्यास सिमेंट मॉर्टर ग्राऊटींग करून ती बंद करावी. अशा अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत. या उपाययोजना आता संबंधित यंत्रणा कितपत गांभीर्याने राबविते यावरच जनतेची सुरक्षितता अवलंबून आहे.