Fri, Jul 19, 2019 05:32होमपेज › Konkan › आंदोलक-पोलिस झटापट : चौघांना सात दिवसांची पोलिस कोठडी

आंदोलक-पोलिस झटापट : चौघांना सात दिवसांची पोलिस कोठडी

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:27PMकणकवली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंद आंदोलनावेळी ओसरगाव येथे कसाल नदीपुलानजीक झालेल्या आंदोलक आणि पोलिस यांच्यातील झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाल्याप्रकरणी शनिवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह गुरूवारी अटक केलेला एकजण असे मिळून चौघांना शनिवारी देवगड न्यायालयात हजर केले असता देवगड न्यायालयाचे न्या. जी. एस. माने यांनी चौघांनाही 3 ऑगस्टपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

या घटनेत एका महिला पोलिस अधिकार्‍यासह चार पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्यातील एका पोलिस कर्मचार्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मराठा आंदोलक बाबा सावंत, बाळासो सूर्यवंशी (दोन्ही रा.किर्लोस) यांच्यासह 22 जणांविरूध्द कणकवली पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न व अन्य काही गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी बाबा सावंत यांच्यावर सध्या ओरोस जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गुरूवारी बाळासो सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी पहाटेपासूनच उर्वरीत संशयितांना अटक करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले.शनिवारी पहाटे याप्रकरणातील आशितोष रमेश सावंत (37, ओवळीये) याला अटक करण्यात आली. तसेच रामचंद्र सदाशिव बोरगावे (55, मूळ रा. बेळगाव, सध्या किर्लोस-धनगरवाडी), तुकाराम बुधाजी लाड (45, किर्लोस) यांना सकाळी अटक करण्यात आली. चौघांनाही गुरूवारी कणकवली पोलिसांनी देवगड न्यायालयात हजर केले. 

संशयितांच्यावतीने अ‍ॅड. ओंकार दीक्षित यांनी बाजू मांडताना 307 हे कलम लावणे चुकीचे आहे, कारण आंदोलक हे आंदोलन करण्यासाठी आले होते. मारहाण करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. त्यांच्याकडे मारहाण करण्यासाठी कोणतेही साहित्य नव्हते, असा युक्तीवाद केला.  तर सरकारी वकील सोमनाथ माळी यांनी आरोपींनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला आहे. हा हल्ला घडवून आणण्याच्या मागे अन्य कुणी व्यक्तींचा हात आहे का याचा तपास करावयाचा आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करावयाची आहे असा युक्तीवाद केला.  न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर संशयितांना पोलिस कोठडी सुनावली.