Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Konkan › आंजिवडे-कोल्हापूर घाटमार्गाचे होणार नूतनीकरण

आंजिवडे-कोल्हापूर घाटमार्गाचे होणार नूतनीकरण

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 10:48PMकणकवली : प्रतिनिधी

माणगाव खोर्‍यातील वसोली- आंजिवडे-गवळीवाडी-भैरीचीपाणंद ते धुरीवाडी-पाटगाव-गारगोटी-कोल्हापूर हा घाट रस्ता ब्रिटीशकालापासून अस्तित्वात आहे. पूर्वी या मार्गावरून माल वाहतूकही होत असे. हा रस्ता वसोली ग्रा.पं.च्या 26 नंबरला लागला असून यामुळे सिंधुदुर्ग-कोल्हापूर अंतर सुमारे 40 कि.मी.ने कमी होणार आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी आम्ही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्यानंतर ना. पाटील यांनी या रस्त्यामध्ये येत असलेली वनखात्याची 40 गुंठे जमीन घेण्याबाबतचा प्रस्ताव करत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी सांगितले.

कणकवलीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतुल काळसेकर म्हणाले, एकूण 6 कि.मी.चा हा घाट रस्ता तयार करावयाचा असून आंजिवडे ग्रामस्थांनी एक कि.मी. घाट रस्ता श्रमदानातून तयार केला आहे. एक कि.मी.चा रस्ता पाटगावच्या हद्दीत येत असून तेथील ग्रामस्थ श्रमदान करण्यासही तयार आहेत. एकूण 4 कि.मी.चा रस्ता तयार करावयाचा असून रस्त्याला चढ-उतार किंवा वळणे नाहीत. रस्ता सपाट आहे. यात वनखात्याची 40 गुंठे जमीन लागण्याची शक्यता आहे. 2003 व 2006 च्या शासन निर्णयानुसार हा रस्ता नूतनीकरणास वनखात्याची अडचण नाही. हा रस्ता झाल्यास पाटगाव ते गारगोटी हे अंतर 30 कि.मी., गारगोटी ते कोल्हापूर अंतर 45 कि.मी. व आंजिवडे ते वेंगुर्ले हे अंतर 40 कि.मी. मिळून एकूण अंतर 115 कि.मी. होणार आहे. आंबोली, फोंडाघाट, गगनबावडा घाटातून हे अंतर 160 कि.मी.पेक्षा जास्त होते. हे तिन्ही घाट सतत कोसळत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद राहते. अशा परिस्थितीत आंजिवडे हा नवा रस्ता सिंधुदुर्ग-कोल्हापूर जनतेसाठी किफायतशीर ठरणार आहे. 

हा रस्ता झाल्यास चिपी विमानतळ, वेंगुर्ले, रेडी ही बंदरे, झाराप,कुडाळ, सावंतवाडी ही रेल्वेस्टेशने कोल्हापूरला जवळची होणार आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय वाढणार आहे. तसेच महादेवाचे केरवडे यात्रेसाठी येणार्‍या भाविकांनादेखील हा मार्ग सोयीचा होणार आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सकारात्मक असून त्यांनी तातडीने या मार्गाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.