होमपेज › Konkan › रोजगारासाठी नवीन कौशल्य अत्यावश्यक : डॉ.भालचंद्र मुणगेकर

रोजगारासाठी नवीन कौशल्य अत्यावश्यक : डॉ.भालचंद्र मुणगेकर

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:23PMकणकवली : वार्ताहर

“तुम्ही ज्या-ज्या क्षेत्रात जाल त्या-त्या क्षेत्रात प्राविण्य संपादित केलात तरच नवीन युगाच्या स्पर्धेत टिकू शकाल. देशात बेरोजगारीचा प्रश्‍न तीव्र होत चालल्यामुळे चांगला रोजगार निर्माण करण्यासाठी नवनवीन रोजगार कौशल्य हस्तगत केली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी खा. डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा बौध्द सेवा संघ मुंबईच्यावतीने रविवार 14 जानेवारी रोजी  महात्मा गांधी सभागृह भोईवाडा- परेल, मुंबई येथे जिल्हयातील कार्यकर्ते व  कुटुंबीयांचे कौटुंबीक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. संघाच्यावतीने कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याची मूळ संकल्पना डॉ.मुणगेकर यांची आहे.  स्नेहसंमेलन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू,  नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयातील मुंबई व ग्रामीण पदाधिकारी आपल्या कुटुंबियासह उपस्थित होते.

या कौटुंबीक स्नेहसंमेलना निमित्त  जिल्हयातील सन 2016-17 या वर्षात 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, अभियंता, डॉक्टर, कलाकार, वृत्तपत्रलेखन, क्रीडा, उच्चपदी निवड, स्पर्धा परीक्षा आणि विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांचे तसेच सामाजिक चळवळीतील 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा डॉ.मुणगेकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. आर्यन देसाई प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा बहारदार असा सुगमसंगीताचा कार्यक्रम झाला.  सूत्रसंचलन अभिनेता नीलेश पवार यांनी तर प्रास्ताविक संघाचे सरचिटणीस बाबूराव सावडावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बौध्द सेवा संघ, मुंबईच्या कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली.