Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Konkan › कणकवली न. पं. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : नीता सावंत-शिंदे 

कणकवली न. पं. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : नीता सावंत-शिंदे 

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 9:31PMकणकवली : शहर वार्ताहर

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातवैधता प्रमाणपत्र समितीकडे पाठवलेल्या अर्जाची पावती किंवा हमीपत्र जोडलेले अर्ज आता वैध ठरणार नाहीत. तसेच ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मतदारांनी निर्भिडपणे  मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत- शिंदे यांनी केले. 

कणकवली  तहसील कार्यालयात मंगळवारी प्रांताधिकार्‍यांनी नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया तसेच प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती पत्रकारांना दिली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वैशाली माने,  मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते.

नीता शिंदे म्हणाल्या, कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत  19 मार्चपर्यंत सकाळी 11 वा. ते दुपारी 3 वा.पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र पाच कक्ष तयार करण्यात आले आहेत. यापैकी चार कक्षांवर प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांना प्राथमिक माहिती मिळावी तसेच त्यांच्या अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी तहसील कार्यालयातील स्वागत कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी आचारसंहिता पथक, भरारीपथक, व्हिडिओ सर्व्हेक्षण व पाहणी पथक अशी चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. आचारसंहिता पथकाकडून सभा, प्रचार, रॅली अशा कार्यक्रमांचे चित्रिकरण केले जाणार आहे. तसेच तहसील कार्यालयातील पाहणी पथकाकडे ते चित्रिकरण सुपूर्द करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. सोशल मीडियावरुन करण्यात येणार्‍या निवडणूक प्रचारावर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

आचारसंहिता भंगाच्या लेखी तक्रारींबरोबरच दूरध्वनीद्वारे आलेल्या तक्रारीही स्वीकारल्या जाणार आहेत. दूरध्वनीद्वारे तक्रारी स्वीकारण्याची प्रक्रिया 24 तास सुरु रहाणार आहे. मात्र, आचारसंहिता भंगाची तक्रार करताना त्यामध्ये स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्यामुळे तक्रारीची पडताळणी करून पुढील कारवाई करणे सोपे होणार आहे.

उमेदवारांनी अर्ज दाखल केला की, त्या दिवसापासून त्यांनी विहित नमुन्यात निवडणूक खर्च निवडणूक शाखेत सादर करायचा आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी 5 लाख रूपये तर नगरसेवक पदासाठी दीड लाख रूपये खर्च मर्यादा आहे. राजकीय पक्ष किंवा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना प्रचारसभा, प्रचार रॅली, निवडणूक प्रचार कार्यालय, ध्वनिक्षेपकाचा वापर आदी सर्व प्रकारच्या परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करण्यात आली आहे. 

कणकवली तहसील कार्यालयातील निवडणूक मदत कक्षात राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांना सर्व परवानगी एकाच ठिकाणी  देण्याची  सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून मतदाराना निर्भीडपणे मतदानाचा हक्‍क बजावता यावा, यासाठी पोलिस प्रशासनानेही नियोजन केले आहे.ऑनलाईन अर्ज भरताना काही त्रुटी आढळल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या  मदत कक्षाजवळ संपर्क साधावा असेही नीता शिंदे यांनी सांगितले.