Sun, Apr 21, 2019 02:31होमपेज › Konkan › शिवसेना आमदारांचे आंदोलन

शिवसेना आमदारांचे आंदोलन

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:23PMकणकवली : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत ठेकेदार कंपनीकडून दिरंगाई केली जात आहे. ठेकेदाराने पावसाळ्यात पर्यायी व्यवस्था न केल्याने महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून वाहनांमध्ये अपघात घडत आहेत. यामुळे वाहनचालक, प्रवासी यांचे नाहक जीव गेले आहेत. ठेकेदार एजन्सीच्या या निष्काळजीपणाचा शिवसेना आमदारांनी निषेध करत नागपूर येथे विधान भवनच्या पायर्‍यांवर जोरदार आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

यावेळी शिवेसना आ. भरत गोगावले, आ. वैभव नाईक,  आ. बालाजी किणीकर, आ. प्रताप सरनाईक, आ. अजय चौधरी, आ. सुनील प्रभू, आ. तृप्ती सावंत, आ. उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
पनवेल ते इंदापूर याठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली सात ते आठ वर्षे कूर्मगतीने सुरू आहे ते अद्याप पूर्ण झालेले नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी पावसाळ्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाहनचालक, प्रवाशांसाठी  हा मार्ग  मृत्यचा सापळा बनत चालला आहे.भरावाची माती महामार्गावर येऊन महामार्ग चिखलमय व निसरडा बनल्याने वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी वगळता कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात घडत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या या ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी विधानभवनात आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलन करून निदर्शने नोंदविली. या ठेकेदारांकडून पर्यायी रस्त्याची व्यवस्था व महामार्गाची  डागडुजी करण्यात यावी या मागणीकडे आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले. तसेच वाहतुकीस असुरक्षित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे 2012 ते 2018 या कालावधीत अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला? जखमी किती झाले याची आकडेवारी बॅनरच्या माध्यमातून निदर्शनास आणली.