Mon, Apr 22, 2019 05:48होमपेज › Konkan › प्रेमविवाह करून आली आणि लाखभराचा ऐवज घेऊन गेली

प्रेमविवाह करून आली आणि लाखभराचा ऐवज घेऊन गेली

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:51PMकणकवली : प्रतिनिधी

बिडवाडी-मांगरवाडी येथील सौ. नंदिनी नंदकिशोर जोईल (20) ही नवविवाहिता शुक्रवारी रात्रौ 1.30 ते शनिवारी सकाळी 6 यावेळेत घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. विशेष म्हणजे जाताना तिने तिच्या अंगावर असलेले सासूचे सोन्याचे मंगळसूत्र, घरातील 50 हजाराची रोकड, कानातले झुमके आणि नवर्‍याचा मोबाईल असा मिळून लाखभराचा ऐवज सोबत घेऊन ती बेपत्ता झाली आहे. 

सौ. नंदिनी हिचे माहेर नारिंग्रे ता. देवगड आहे. गतवर्षी तिचा नंदकिशोर जोईल (रा. बिडवाडी) याच्याशी प्रेमविवाह झाला होता. शुक्रवारी रात्रौ घरात टिव्हीवर 1.30 वा. पर्यंत सिनेमा बघत होती. मात्र, सकाळी 6 वा. घरच्या मंडळींनी पाहिले असता ती घरात नव्हती. 

तिचा शोध घेऊनही ती कुठेच सापडली नाही. अंगाने सडपातळ, उंची पाच फूट 2 इंच, रंगाने सावळी, अंगावर केसरी रंगाची साडी व ब्लाऊज, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल, अंगावर सोन्याचे मंगळसूत्र असे तिचे वर्णन आहे. विशेष म्हणजे घरातून जाताना तिने घरातील 50 हजार रु. ची रोकड, अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल सोबत घेऊन गेली. ती बेपत्ता झाल्याची खबर तिचा पती नंदकिशोर याने कणकवली पोलिसात दिली. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.