Sat, May 30, 2020 04:53होमपेज › Konkan › बिबट्यांची कातडी विकणारी टोळी गजाआड

बिबट्यांची कातडी विकणारी टोळी गजाआड

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:31PMकणकवली : प्रतिनिधी

हुंबरठतिठा दरम्यान काहीजण बिबट्याची कातडी विकण्यासाठी येत असल्याची टीप स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाला मिळाली. या पथकाने सापळा रचून सोमवारी रात्री 8 ते 10.30 वा.च्या दरम्यान एका पांढर्‍या रंगाच्या टाटा सुमो गाडीतून दोन बिबट्यांची 13 लाख रु. किमतीची कातडी जप्त केली. या गुन्ह्यात कातडी, चार लाखांची सुमो गाडी आणि 65 हजारांचे मोबाईल असा मिळून 17 लाख 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आठजणांना गजाआड करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून मंगळवारी सायंकाळी कणकवली पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. सोमवारी रात्री याबाबतची टीप मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवीराज फडणीस, पोलिसनाईक कृष्णा केसरकर, सदानंद राणे, पो.का. रवी इंगळे, संकेत खाडे, अमित तेली यांनी हुंबरठ तिठा येथे सापळा रचला. मिळालेल्या टीपनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास एका पांढर्‍या रंगाच्या टाटा सुमो गाडीतून काही लोक कणकवलीच्या दिशेने येताना दिसले. या गाडीची थांबून तपासणी केली असता चालकाच्या शेजारी एक अमेरीकन टुरिस्टची बॅग होती. ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये बिबट्या या वन्य प्राण्याचे कातडे असल्याचे दिसून आले. तर मागे बसलेल्या एका इसमाच्या पायाजवळ एका पांढर्‍या रंगाच्या प्लॅस्टिकच्या बारदानामध्ये लालसर बिबट्या प्राण्याचे कातडे दिसून आले. त्यातील एक कातडे साधारणपणे ओलसर होते तर दुसरे सुकलेले होते. यातील एका कातड्याची किंमत 8 लाख असून दुसर्‍या कातड्याची किंमत 5 लाख अशी मिळून 13 लाख रूपये आहे. यातील आरोपींसह मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी वर्ग केला. 

याप्रकरणी राजेंद्र पंढरीनाथ पारकर (58), नागेश राजेंद्र पारकर (27, दोन्ही रा. आरेफाटा-देवगड), सखाराम बाबाजी घाडी (55, किंजवडे), अर्जुन गोविंद वारिक (44, नाडण), योगेंद्र दत्ताराम मेस्त्री (39, मुटाट), समीर सुहास भोसले (38, कळंबस्ते-चिपळुण), दिगंबर हरिश्‍चंद्र गुरव (55, लोरे नं.1) आणि उमेश मारूती तेली (36, हरकुळखुर्द) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे कातडे गैरकायदा बिगर परवाना विक्रीसाठी घेवून जात असताना आरोपी आढळून आले आहेत.  मंगळवारी सायंकाळी आरोपींना कणकवली न्यायालयात हजर केले असता 17 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक निमिष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. ओटवणेकर करत आहेत.