होमपेज › Konkan › करूळ येथे टेम्पोच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

करूळ येथे टेम्पोच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 10:20PMकणकवली : प्रतिनिधी

करूळ येथील नाथ पै ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलचा आठवीतील विद्यार्थी सचिन श्यामसुंदर चव्हाण (14, तिवरे-चव्हाणवाडी) हा शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी निघाला होता. त्याचवेळी करूळ बसथांब्यानजीक उतारावर फोंड्याच्या दिशेहून येणार्‍या बोलेरो टेम्पोची धडक बसली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तत्काळ करूळ सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.  ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वा.च्या सुमारास देवगड-निपाणी मार्गावर करूळ येथे घडली.

सचिन चव्हाण हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत शाळा सुटल्यानंतर सायकलने तिवरे येथील घरी निघाला होता. त्याचवेळी फोंड्याहून  रत्नागिरीकडे जाण्यासाठी बोलेरो टेम्पो येत होता. करूळ येथील बसथांब्याजवळ उताराला सचिनच्या सायकलचे स्टेअरिंग टेम्पोला लागल्याने टेम्पोच्या दर्शनी भागाला आदळून सचिन रस्त्याच्या बाहेर फेकला गेला. यात त्याच्या छातीला, हाताला गंभीररित्या दुखापत झाली. सायकलचा तर चुराडाच झाला होता. या घटनेनंतर तत्काळ करूळ सरपंच बबन कर्णिक, उपसरपंच विनायक गोमणे, राजू ढवण व ग्रामस्थांनी जखमी सचिनला गाडीतून कणकवलीतील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. 
गणपतीपुळे येथील विराज शिवलकर हा बोलेरोचा टेम्पोचालक आहे. त्याने अपघातानंतर टेम्पो थांबविला. याबाबत कणकवली पोलिसांनाही कळविण्यात आले होते. अधिक तपास फोंडाघाट पोलिस करत आहेत.