Mon, Jun 24, 2019 17:58होमपेज › Konkan › अतिवृष्टी : शेतकर्‍यांना मिळणार ३० लाखांची मदत

अतिवृष्टी : शेतकर्‍यांना मिळणार ३० लाखांची मदत

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:16PMकणकवली : प्रतिनिधी

 एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतपिकांच्या आणि फळपिकांच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये 110 कोटी 9 लाख 750 एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील 844 बाधीत शेतकर्‍यांना 164 हेक्टर क्षेत्रासाठी 29 लाख 52 हजाराची नुकसानभरपाई मिळणार आहे. 

राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक आणि फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. या बाधीत शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्यात आला होता. या संदर्भात 5 जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बाधीत शेतकर्‍यांना आता नुकसानभरपाई दिली जाणार आहे. 

महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याचे आधारे पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याप्रकरणी ही मदत दिली जाणार आहे. मदतीची रक्कम संबंधित बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेला कोणत्याही प्रकाराची वसुली करता येणार नाही. या रक्कमेचे वाटप झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रक्कमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. 

या निर्णयानुसार कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील 2 लाख 12 हजार 818 बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या 82 हजार 694.41 हेक्टर बाधित शेतीसाठी 57 कोटी 76 लाख एवढी रक्कम नुकसानभरपाई म्हणून अदा केली जाणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 88 हजार 680 बाधित शेतकर्‍यांना 24 कोटी 55 लाख, पालघर जिल्ह्यातील 66 हजार 923 बाधित शेतकर्‍यांना 18 कोटी 62 लाख, रायगड जिल्ह्यातील 53 हजार 776 शेतकर्‍यांसाठी 13 कोटी 90 लाख, रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजार 595 बाधित शेतकर्‍यांसाठी 36 लाख 94 हजार तर सिंधुदुर्गातील 844 बाधित शेतकर्‍यांसाठी 29 लाख 52 हजार एवढी नुकसानभरपाई दिली जाणार आहे.