Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Konkan › कणकवलीचा गावठी बाजार ‘ग्राऊंड फुल्ल’! 

कणकवलीचा गावठी बाजार ‘ग्राऊंड फुल्ल’! 

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 10:18PMकणकवली : शहर वार्ताहर 

  कणकवली पंचायत समिती,सिंधुदुग बँक तसेच स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ यांच्या विद्यमाने  कणकवली येथील जि.प. बांधकाम उपविभाग आवारात दर शुक्रवारी गावठी आठवडा बाजार भरवण्यात येत आहे. या आठवडा बाजाराला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट दिली.  आठवडा बाजाराला विक्रेते व ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याने श्री. सावंत यांनी समाधान व्यक्त करत, जिल्ह्यातील उर्वरीत सातही तालुक्यात गावठी बाजाराची सुरुवात करण्यात येणार असल्याचे वाढवणार असल्याचे सांगितले.

 जिल्ह्यातील या गावठी आठवडा बाजाराची सुरुवात 26 जाने.रोजी कणकवलीतून झाली. पहिल्याच बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसर्‍या शुक्रवारी या बाजारात विक्रेत्यांची वाढ झाली. तब्बल 58 विक्रेते या बाजारात आपण पिकवलेला माल विक्रीसाठी घेऊन आले होते. कालौघात गेलेला विविध शेतमाल पुन्हा या बाजारामुळे ग्राहकांना खरेदी करावयास मिळाला. शेतमाल खरेदीसाठी ग्राहकांची  झुंबड लागली होती.

जिल्हयातील इतर बाजरपेठांच्या तुलनेत कणकवलीतील  बाजारपेठ ही आर्थिक उलाढालीत अग्रेसर मानली जाते. मंगळवार हा कणकवली बाजाराचा महत्वाचा दिवस आहे. त्याचतच कृषी क्षेत्रातील जाणकार सतीश सावंत यांच्या पुढाकारातून या ठिकाणी शेतकर्‍यांना आपल्या मालाचा हमीभाव मिळावा.नागरिकांना गावठी उत्पादनाचा आस्वाद घेता यावा तसेच शेतकर्‍यांनाही या बाजारामुळे आपले उत्पादन वाढवण्यासाठी गती मिळावी याच उद्देशाने हा आठवडा बाजार सुरु करण्यात आला.  

या बाजारात कणकली तालुक्याबरोबरच मालवण, कुडाळ, वैभववाडी आदी तालुक्यातील शेतकर्‍यांनी तसेच बचत गटांच्या महिलांनी स्वतः  पिकवलेला व उत्पादित केलेला माल विक्रीसाठी आणला होता. हळवळ येथील रंजिता मांजरेकर यांनी कणगी, पोहे, पालेभाजी, शेगुल शेंगा, उकडे तांदूळ, गावठी अंडी तर रामगड येथील उर्मिला मुणगेकर यांनी कोकम, आगूळ, चुरून, वांगी, मिरची रोप, उन्हाळी बी-बियाणे, साकेडीच्या राजश्री परब यांनी गावठी कोंबड्या तर पोईपचे बाबा वर्दम यांनी हिराची झाडू, कुळीथ, गावठी केळी, तांदूळ, नारळ अशा प्रकारचा विविध शेतमाल शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला होता.