होमपेज › Konkan › पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन ठरणार आगळेवेगळे 

पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन ठरणार आगळेवेगळे 

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:47PMकणकवली : वार्ताहर

मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राचे  येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे 13 मे रोजी होणारे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आगळेवेगळे आणि यशस्वी करण्याचा निर्धार सहविचार सभेत करण्यात आला. 

संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सिंधुभूमी कला अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार, कार्यवाह सतीश लळीत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. संमेलनाच्या पूर्वसंध्येला शहरातून दिंडी, मालवणी लघुपट महोत्सव, मालवणी खाद्यजत्रा, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार, काही नाट्यप्रवेश, नाटक असे वेगवेगळे उपक्रमही यानिमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत.

 संमेलन व त्यानिमित्ताने आयोजित अन्य कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.  अकादमीचे कार्यवाह कवी मधुसुदन नानिवडेकर, विजय गावकर, अभय खडपकर, श्याम नाडकर्णी, विलास खानोलकर, कमलेश गोसावी, डॉ. सई लळीत, डॉ. संदीप नाटेकर, विकास गावकर, कुणाल मांजरेकर, राजश्री धुमाळे, कल्पना मलये, राजस रेगे, रवींद्र मुसळे, डॉ. विठ्ठल गाड, महेश खोत, डॉ. रामदास बोरकर, रोहन पारकर, सचिन शिरवलकर, गीतांजली कामत, सुप्रिया तायशेटे, प्राची कर्पे आदी उपस्थित होते.

 संमेलन व अन्य कार्यक्रमांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व काही महत्वाच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. मालवणी लघुपट महोत्सव समिती (अध्यक्ष विजय गावकर), मालवणी खाद्यजत्रा समिती (अध्यक्षा राजश्री धुमाळे), दिंडी आयोजन (विवेकानंद वाळके), नेपथ्य व सजावट समिती (अध्यक्ष डॉ. संदीप नाटेकर), निमंत्रण व साहित्यिक संपर्क समिती (अध्यक्ष श्याम नाडकर्णी), मंडप व्यवस्था समिती (अध्यक्ष समर्थ राणे), प्रसिद्धी समिती (अध्यक्ष सतीश लळीत), हास्यकवि संमेलन समिती (अध्यक्ष कमलेश गोसावी) अशा अनेक समित्या नेमण्यात आल्या. संमेलनाच्या प्रारंभी पारंपरिक गार्‍हाणे घालण्याची व संमेलनातील कायक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी  विलास खानोलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

समित्यांच्या स्वतंत्र बैठका होऊन सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कणकवली शहर व परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या समित्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. संमेलनाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचे आणि सामाजिक माध्यमांचे सहकार्य घेतले जाणार आहे. मालवणी कवितांना मिळणारा प्रतिसाद पाहता कविसंमेलनासाठी एक तास वेळ देण्यात आला आहे. तसेच, याला जोडूनच हास्यकवि संमेलनही होणार आहे. मालवणी कवितांच्या नाट्याविष्कारही सादर करण्यात येणार आहे. पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आणि त्या अनुषंगाने आयोजित सर्व कार्यक्रम हे सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचे आहेत. या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रमोद जठार व कार्यवाह सतीश लळीत यांनी केले आहे.