होमपेज › Konkan › गणपती बाप्पा एस.टी.ला पावला!

गणपती बाप्पा एस.टी.ला पावला!

Published On: Sep 07 2018 10:19PM | Last Updated: Sep 07 2018 10:19PMकणकवली : प्रतिनिधी

लाडक्या गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने मुंबई, ठाणे तसेच विविध भागातून कोकणात येणार्‍या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मोठ्या संख्येने जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी चाकरमान्यांनी रेल्वेबरोबरच महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही यावर्षी मोठी पसंती दिली आहे. गतवर्षी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून एसटीच्या 2,100 जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यात यंदा सव्वाशे बसची भर पडली असून जवळपास 2,225 जादा बसेस फुल्ल झाल्या आहेत. हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे. मुंबई विभागातून 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीत सिंधुदुर्गात येणार्‍या 159 गाड्या आरक्षित झाल्या असून जिल्ह्यातून परतीसाठी आतापर्यंत 96 गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. याशिवाय ठाणे, पालघर या विभागातूनही मोठ्या संख्येने एसटीच्या गाड्या चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात येणार आहेत.

मुंबई, ठाण्यासह विविध भागात नोकरी धंद्यानिमित्त स्थिरावलेला चाकरमानी आपल्या कुटुंबकबिल्यासह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होतोच. त्यामुळे कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळातर्फे चाकरमान्यांच्या सोयीसाठी मोठ्या संख्येने जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच खासगी आरामबस आणि खासगी गाड्यांनी मोठ्या संख्येने चाकरमानी मंडळी कोकणात दाखल होतात. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन सातारा-कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्याचा पर्यायही उपलब्ध केला आहे. गणपतीसाठी शासनाने खास मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सह काही मार्ग टोल फ्री केला आहे. मुंबई-सेंट्रल, परळ, बोरिवली, ठाणे, भाईंदर, वसई, विरार अशा विविध भागातून एसटी महामंडळाकडून कोकणात येण्यासाठी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. 

यावर्षी चाकरमान्यांनी एसटीला मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे जादा गाड्या बरोबरच एसटीच्या नियमित 225 गाड्यांचे आरक्षणही संपले आहे. ग्रुप बुकींगप्रमाणेच संगणकीकृत आरक्षणाचाही यात समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची अडचण टाळण्यासाठी सातारा-कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्यासाठी जादा पैसे मोजण्याची तयारीही चाकरमान्यांनी दाखविली आहे. 

मुंबई विभागातून सिंधुदुर्गसाठी 159 गाड्या आरक्षित सिंधुदुर्गात 8 सप्टेंबरपासून चाकरमानी दाखल होण्यास सुरूवात होणार आहे. यासाठी मुंबई विभागातून 8 सप्टेंबरला 2, 9 सप्टेंबरला 9, 10 सप्टेंबरला 44, 11 सप्टेंबरला 92 आणि 12 सप्टेंबरला 12 अशा 159 गाड्यांचे सिंधुदुर्गसाठी आरक्षण फुल्ल झाले आहे. याशिवाय ठाणे, पालघर या विभागातूनही मोठ्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात येणार आहेत. 18 सप्टेंबरपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असून सिंधुदुर्गातून परतीसाठी आतापर्यंत 96 गाड्या आरक्षित झाल्या आहेत, अशी माहिती सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.  गावागावातूनही चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने  जादा गाड्या सोडण्याची सज्जता ठेवली आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे गाड्या सोडल्या जाणार असून गावात जर ग्रुप बुकींग झाल्यास 44 सीटसाठी एक बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे विभागनियंत्रकांनी सांगितले. चाकरमान्यांच्या येण्याचा आणि जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने सर्व ती सज्जता ठेवली आहे. त्यामुळे एकूणच चाकरमान्यांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीत भर पडणार आहे.