Sun, Aug 25, 2019 08:09होमपेज › Konkan › वागदेत कंटेनर-मोटारसायकलमध्ये अपघात

वागदेत कंटेनर-मोटारसायकलमध्ये अपघात

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:11PMकणकवली : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-डंगळवाडी येथे रविवारी सायंकाळी 4.30 वा.च्या सुमारास कंटेनर व मोटारसायकलमध्ये अपघात झाला. अपघातात मोटारसायकलस्वार गणपत वसंत परब (45) हे गंभीर जखमी झाले. गणपत परब हे मालवण तालुक्यातील वायंगवडे गावचे सरपंच असून ते मोटरसायकलने कणकवलीच्या दिशेने येत होते. त्यांची प्रकृती गंभीर असून कणकवलीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वायंगवडे-कुळकरवाडी येथील गणपत परब हे होंडा शाईन मोटारसायकलने कणकवलीच्या दिशेने येत होते. वागदे-डंगळवाडी येथील उतारावर समोरून येणार्‍या कंटेनरच्या मागील चाकाला त्यांची मोटारसायकल धडकली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते गंभीररित्या जखमी होत महामार्गावरच पडले होते. याच दरम्यान वागदे येथील बजरंग ऑटोमोबाईल्सचे मालक सागर डवरे, मित्र प्रशांत रसाळ यांच्या समवेत गाडीची ट्रायल घेण्यासाठी जात होते. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या गणपत परब यांना आपल्या गाडीतून उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणले. गणपत परब यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून सागर डवर यांनी अपघाताची माहिती नातेवाईकांना दिली. कणकवलीतील ऋषीकेश कोरडे, राजा पाटकर व इतरांनी उपजिल्हा रूग्णालयात जावून उपचारासाठी मदत केली. 

गणपत परब यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिल्या. परब यांचे भाऊ व नातेवाईक उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कणकवलीतील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वायंगवडे उपसरपंच आनंद सावंत व ग्रामस्थांनी कणकवलीत धाव घेतली. 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिस 

एस. ए. साळसकर व आर. आर. सावंत तसेच कणकवलीचे पोलिस मंगेश बावदाने व जीवन कुडाळकर यांनी वागदे येथे धाव घेतली. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला होता. दोन्ही वाहने महामार्गावरच असल्याने काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती.