Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Konkan › कारच्या धडकेने वृद्ध पादचारी ठार

कारच्या धडकेने वृद्ध पादचारी ठार

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:04PMकणकवली : प्रतिनिधी

दिगवळे येथून कणकवलीकडे जात असलेल्या मारुती ओम्नी गाडीची धडक बसून मारुती धोंडू पारकर (वय 74, रा. हरकूळ बुद्रुक, कांबळेवाडी) यांचा मृत्यू झाला. हरकूळ बुद्रुक सोसायटीकडून ते चालत रस्त्याच्या डाव्या बाजूने आपल्या घरी निघाले होते. हा अपघात बुधवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास कणकवली-नरडवे मार्गावर हरकूळ बुद्रुक मडाचा ओहोळपासून काही अंतरावर ऊस शेतीनजीक घडला. याप्रकरणी हयगयीने वाहन चालवून मारूती पारकर यांच्या गंभीर दुखापतीस आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओमनी चालक हरिश्‍चंद्र परब याच्या विरूध्द कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

दिगवळे -रांजणवाडी येथील हरिश्‍चंद्र कृष्णा परब हे आपली कार घेऊन सकाळी कणकवलीकडे निघाले होते. त्याचवेळी वरील घटनास्थळी मारूती पारकर हे सोसायटी आणि रेशन दुकानाकडील  काम आटोपून घरी रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालत होते.  हरिश्‍चंद्र परब यांच्या कारनची पारकर यांना जोरदार धडक बसली. त्यात ते गाडीच्या काचेवर आपटून गंभीर जखमी झाले. परब यांनी त्यांना तत्काळ गाडीत घालून उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

मारूती पारकर हे आपल्या पत्नीसमवेत हरकुळ बुद्रुक येथे राहत असत. त्यांच्या पश्‍चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मारूती पारकर यांच्या या अपघाती निधनाने हरकुळ बुद्रुकमध्ये हळहळ व्यक्‍त होत आहे. याबाबतची फिर्याद केतन पारकर याने कणकवली पोलिसांत दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. घाडगे करत आहेत.