Thu, May 23, 2019 14:50
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › भालचंद्र महाराज जयंती उत्सवास भक्‍तिमय वातावरणात प्रारंभ

भालचंद्र महाराज जयंती उत्सवास भक्‍तिमय वातावरणात प्रारंभ

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:18PM

बुकमार्क करा
कणकवली  : प्रतिनिधी

असंख्य भाविक भक्‍तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 114 व्या जन्मोत्सव सोहळ्यास बुधवारपासून भक्‍तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या सोहळ्यामुळे कनकनगरी भक्‍तिरसात न्हाऊन गेली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, दरदिवशी हजारो भाविकांची मांदियाळी आणि सर्वत्र मंगलमय वातावरण यामुळे या उत्सवाची  रंगत दिवसेंदिवस वाढतच आहे. 

बाबांच्या उत्सवाची सुरुवात होते तीच पहाटेच्या काकड आरतीने. पहाटेची गुलाबी थंडी, मधूनच येणारी एखादी वार्‍याची झुळुक आणि संस्थानमधील सुरू होणारे बाबांच्या आरतीचे स्वर हे सारे वातावरण मनाला प्रसन्‍नता देते. भल्या पहाटेही हजारो भक्‍तांची काकड आरतीसाठी गर्दी असते. आरती संपली की सुरू होते ती बाबांच्या समाधी दर्शनाची रांग. तत्पूर्वी समाधी पूजा, अभिषेक असे विविध विधी पार पडतात. पहिल्याच दिवशी विविधरंगी फुलांनी बाबांची समाधी आणि संपूर्ण संस्थानचा परिसर सजविण्यात आला होता. भक्‍तांंच्या कल्याणार्थ दत्तयाग, दुपारी आरती, त्यानंतर महाप्रसाद आणि बरोबरच भजने सुरू होतात. सिंधुदुर्गच्या कानाकोपर्‍यातूनच नव्हे, तर देश-विदेशांतून बाबांचे भक्‍तगण या उत्सवाला हजेरी लावत आहेत. बाबांच्या या उत्सवाचा प्रत्येक दिवस गर्दीचा नवा उच्चांक ठरणार आहे. सायंकाळच्या सत्रात भक्‍तांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच असते. बाबांचा हा प्रत्येक सोहळा भक्‍तांसाठी नयनरम्य भावभक्‍तीचा सोहळाच असतो. बाबांच्या या जन्मोत्सव सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.