Mon, Jun 24, 2019 17:21होमपेज › Konkan › सोनवडे घाटाचे प्रत्यक्ष काम पुढील हंगामातच!

सोनवडे घाटाचे प्रत्यक्ष काम पुढील हंगामातच!

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:26PM

बुकमार्क करा
कणकवली : अजित सावंत

35 ते 40 वर्षांच्या अथक लढ्यानंतर दृष्टिपथात आलेला कुडाळ तालुक्यातील सोनवडे-घोटगे या नियोजित घाटमार्गातील बहुतांशी अडथळे आता दूर झाले आहेत. मात्र, पर्यावरण खात्याची अंतिम एनओसी, डीपीआर, तांत्रिक मंजुरी, टेंडर प्रक्रिया या बाबी लक्षात घेता या घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास पुढील पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबरच उजाडणार आहे. या घाटमार्गासाठी 210 कोटींचा निधी मंजूर आहे.9 कि.मी. च्या प्रत्यक्ष घाटक्षेत्रातील फ्लायओव्हर, टनेल, मायनर ब्रीज या बाबी पाहता वाढीव खर्चाचा अंदाज घेण्यासाठी सध्या या कामाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दक्षिण कोल्हापूर सा. बां. विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सध्या आंबोली, फोंडा, करूळ आणि भुईबावडा असे चार घाट उपलब्ध आहेत. आता मठ-कुडाळ-शिवडाव-कडगाव-गारगोटी रस्ता या 179 क्र. राज्यमार्गावर सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा जोडण्यासाठी सोनवडे घाट होऊ घातला आहे. या घाटमार्गाची एकूण लांबी सुमारे  11 कि.मी. आहे. प्रत्यक्ष घाटक्षेत्र 9 कि.मी.चे आहे. यामध्ये साडेपाच कि.मी. सिंधुदुर्ग हद्द आणि साडेतीन कि.मी. कोल्हापूरची हद्द आहे. या घाटमार्गासाठी गेल्या 30 ते 35 वर्षांत स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर या घाटमार्गाला चालना मिळाली. दोन्ही बाजूचे जोड रस्ते तयार करण्यात आले.  नांदेड येथे वनखात्याला पर्यायी वनजमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर वन्य जीवांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला. त्याबाबत केंद्रीय वनविभागाच्या टीमने सर्व्हे करून अहवाल सादर केला आणि केंद्रीय वनखात्याकडून या घाटमार्गाला हिरवा कंदील मिळाला. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने या घाटमार्गासाठी 210 कोटींचा निधी मंजूर केला.