Wed, Mar 20, 2019 03:16होमपेज › Konkan › ‘एलईडी’ फिशिंगवर कारवाई करा

‘एलईडी’ फिशिंगवर कारवाई करा

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 10:41PMकणकवली : प्रतिनिधी

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील एलईडी लाईट फिशिंगच्या वादासंदर्भात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केंद्रीय कृषी मंत्रालय, कोस्टगार्ड आणि केंद्रीय वाणिज्य खाते यांची उच्चस्तरीय संयुक्त बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी नवी दिल्लीत ना. सुरेश प्रभू यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत ना. प्रभू यांनी एलईडी लाईटफिशिंगसंदर्भात सक्त कारवाईचे आदेश कोस्टगार्ड विभागाला दिले. 

या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव एस. के. पट्टनाईक,  इंडियन कोस्टगार्ड कमांडन्ट भीमसिंह कोठारी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, सिंधुदुर्ग भाजपचे  माजी जिल्हाध्यक्ष
 अतुल काळसेकर, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरस्कर तसेच इतर उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

 या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन एलईडी लाईट फिशिंगसंदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने कोस्टगार्डचे अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याचे तसेच कारवाईचे अधिकार व्यापक आणि स्पष्ट करणे, सागरी राज्यांच्या मत्स्यद्योग विभागाचे कार्यक्षेत्र 12 सागरी मैल  वाढवून 25 सागरी मैल करणे, अतुल काळसेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 च्या 14 व्या कलमामध्ये अनधिकृत मासेमारी करणार्‍या नौकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात आवश्यक बदल करणे तसेच एलईडी लाईट फिशिंग बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी कोस्टगार्ड आणि स्थानिक प्रशासन यांना दिले.  खा. नरेंद्र सावईकर यांनी या विषयात पूर्ण अभ्यास करून कायद्यातील आवश्यक बदलांसाठी आगामी संसदेच्या अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पारंपरिक मच्छीमार व मत्स्योद्योग यांच्यावर एलईडी लाईट फिशिंग वापरामुळे होणार्‍या अन्यायाविरुद्ध सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.