होमपेज › Konkan › दूध उत्पादकांचे १६ रोजी ‘किटली आंदोलन’

दूध उत्पादकांचे १६ रोजी ‘किटली आंदोलन’

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 9:53PMकणकवली : वार्ताहर

शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना कमी दर मिळत आहे.  शासनाच्या उदासिनतेमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत. शासनाला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकरी 16 जुलै रोजी किटली आंदोलन करणार आहेत. सिंधुदुर्गच्या कानाकोपर्‍यातील शेतकरी सोबत दूधाची किटली घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरात सकाळी 10 वा. दूधाचा अभिषेक केल्यानंतर सर्व दूध उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. हे आंदोलन पक्षविरहित असून सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. 

कणकवली येथील शेतकरी संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांनी किटली आंदोलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. सिंधुदुर्गात म्हैशीचे सुमारे 25 हजार तर गायीचे सुमारे 9 हजार लिटर दूध उत्पादित होत आहे. गोकूळ दूध संघाकडून  एखाद्या डेअरीकडे म्हैशीचे 100 लिटर दूध असेल तर गायीचे 30 लिटर दूध फॅट प्रमाणे 23 ते 24 रू. दराने घेतले जाते व त्यापेक्षा जास्त असलेले दूध सरासरी 17 रू.लिटर दराने घेतले जाते. हा दर पाण्याच्या बिसलरी बॉटलच्या दरापेक्षाही कमी असून ही तर दूध उत्पादक शेतकर्‍यांची चेष्टा आहे. एकीकडे दूध उत्पादकांचे दर कमी करायचे आणि दुसरीकडे तेच दूध दुप्पट दराने विक्रीसाठी आणले जात आहे. शासनाचा हमी दरापेक्षाही शेतकर्‍यांना हमी दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असून कर्जाची परतफेड थांबलेली आहे. शासनाचे धोरण असेच उदासिन राहिल्यास दूध उत्पादन हा पूरक व्यवसाय म्हणून करण्यास शेतकरी तयार होणार नाहीत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दूध उत्पादकांकडून हे किटली आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

किटली आंदोलनात सहभागी होणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याने घरातून येताना किटलीतून दूध गरम करून आणावयाचे आहे. रवळनाथ मंदिरात अभिषेक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा रूग्णालयातील रूग्ण, वृध्दाश्रमातील वृध्द नागरीक व अंगणवाडीतील मुलांना या दूधाचे वाटप होणार आहे. गोवा राज्याप्रमाणे शेतकर्‍यांना लिटरमागे गायीला 8 रू. व म्हैशीला 10 रू. पेक्षा जास्त अनुदान मिळावे, दूध जनावरांच्या खरेदीसाठी 90 टक्के अनुदान मिळावे, पशुखाद्याच्या खरेदीसाठी अनुदान मिळावे, पशुवैद्यकीय सेवा पूर्ण मोफत करावी, सिंधुदुर्गातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात आदी प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे मांडण्यात येणार आहेत. आंदोलनाच्या नियोजनासाठी येत्या काळात जिल्ह्यातील सर्व दूध संकलन केंद्रांवर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला जाणार आहे. सिंधुदुर्गातील शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा यासाठी हे आंदोलन होत आहे. शेतकर्‍यांविषयी कळवळा, आस्था असणारी सर्व मंडळी या पक्षविरहित आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकर्‍यांप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन सिंधुदुर्गातील सर्व जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, ग्रा. पं. सदस्य, विकास संस्थांचे चेअरमन, संचालक, दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व सर्व दूध उत्पादक  शेतकरी  आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी सतीश सावंत यांनी सांगितले.