Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Konkan › पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा 

पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा 

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:41PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील पदवीधर, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल. विधिमंडळात या विविध प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणली जाईल. शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मोकळीक देत तेच काम सुशिक्षित बेरोजगारांकडून करून घेण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांनी दिली. तसेच सिंधुदुर्गातील सुशिक्षित बेरोजगारांना जिल्ह्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सामावून घेण्याच्यादृष्टीने आवश्यक तो डाटा गोळा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथमच मतदारांचे आभार आणि गाठीभेटी घेण्यासाठी आ. निरंजन डावखरे हे शनिवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले होते. त्यांनी आपल्या दौर्‍याची सुरूवात शनिवारी सकाळी कणकवलीपासून केली. शनिवारी येथील भाजप जिल्हा कार्यालयाला भेट दिली आणि शिक्षक, पदवीधरांसह मतदारांचे आभार मानले. तसेच विविध प्रश्‍नांची निवेदनेही स्वीकारली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शनिवारी त्यांनी कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण अशा ठिकठिकाणी   मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. 

आ. निरंजन डावखरे म्हणाले, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यातून आपल्याला घवघवीत मतदान झाले. ज्या मतदारांनी आपल्यावर विश्‍वास टाकला आहे, त्यांचे प्रश्‍न, समस्या आपण शासन दरबारी सोडविणार आहे. भाजपचे ‘संपर्क से समर्थन तक’ अभियान तसेच भाजप युवा मोर्चाच्यावतीने सुशिक्षित बेरोजगारांना कुशल,अकुशल वर्गवारीत रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी, सिंधुदुर्गात येत्या काळात येवू घातलेल्या विविध प्रकल्पांच्या ट्रेडचे आवश्यक प्रशिक्षण या बेरोजगारांना देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या शासकीय योजनांच्या माध्यमातून इथल्या सुशिक्षित पदवीधरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीही आपले प्रयत्न आहेत. निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठीही आपण प्रामाणिकपणे काम करणार आहे. माझा 2 कोटीचा आमदार निधी आहे. पाच जिल्ह्यांमध्ये तो वितरीत करत असताना सिंधुदुर्गला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला जाईल. सातत्याने या जिल्ह्यात संपर्क ठेवून पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षकांचे प्रश्‍न सोडविले जातील अशी ग्वाही आ. डावखरे यांनी दिली.