Thu, Jul 18, 2019 15:06होमपेज › Konkan › एटीएम कार्ड नंबर विचारून १ लाख ४० हजारांचा गंडा

एटीएम कार्ड नंबर विचारून १ लाख ४० हजारांचा गंडा

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:11PM कणकवली : प्रतिनिधी

बिडवाडी येथील गणेश देवू लाड (67) यांना त्यांच्या एटीएम कार्डवरील सोळा अंकी नंबर विचारून अभ्युदय व स्टेट बँक अशा दोन बँक खात्यांतील 1 लाख 39 हजार 47 रुपये एवढी रक्कम अज्ञाताने परस्पर लंपास केली. 

ही घटना 9 ते 10 जून या कालावधीत घडली. बिडवाडी येथे गणेश लाड हे घरात एकटेच राहतात. त्यांची पत्नी व मुले मुंबईला राहतात. लाड व त्यांच्या पत्नीचे अभ्युदय बँकेत एकत्रित बचत खाते व एटीएम कार्ड आहे. तर स्टेट बँकेत पेन्शनचे बचत खाते व एटीएम कार्ड आहे. शनिवार 9 जून ला दु. पावणे एक च्या सुमारास गणेश लाड यांना 8877782150 या क्रमांकावरून फोन आला. पलिकडून मराठीतूनच बोलणार्‍याने तुमचे अभ्युदयचे एटीएम कार्ड बंद झाले आहे, ते सुरू करण्यासाठी कार्डवरील 16 अंकी नंबर द्या असे सांगितले. त्यावेळी खरोखरच बँकेतूनच फोन आला असेल असे वाटल्याने श्री. लाड यांनी त्याला आपल्या एटीएमचा सोळा अंकी नंबर सांगितला. त्यावर पलीकडून बोलणार्‍याने तुम्हाला मोबाईलवरून मेसेज येईल,  तो नंबर मला सांगा असे सांगितले. त्यावरून लाड यांनी मोबाईल वर आलेल्या मेसेजवरील नंबरही त्याला कळवला. रविवार 10 जूनलाही श्री. लाड यांना त्याच नंबरवरून फोन आला. त्यावेळी पलीकडून बोलणार्‍याने स्टेट बँकेचे एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगितले. त्यावेळीही शनिवारचीच पुनरावृत्ती झाली.

 मंगळवार 12 जूनला श्री. लाड हे अभ्युदय बँकेत गेले. तेथे त्यांनी स्लीप द्वारे 10 हजार रू. खात्यातून काढले. त्यावेळी पासबूकवर एन्ट्री केली असता 1 लाख 30 हजार रू. कमी झाल्याचे आढळले. तर पुढे स्टेट बँकेत जावून पासबूक एंट्री केली असता 9 हजार 47 रू. कमी झाल्याचे आढळले. याबाबत लाड यांनी दोन्ही बँकांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. अखेर फसवणूक झाल्याचे समजल्याने लाड यांनी कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.