Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Konkan › आठवडा बाजारात पर्स व मोबाईल लांबविणार्‍या दोन महिला ताब्यात

आठवडा बाजारात पर्स व मोबाईल लांबविणार्‍या दोन महिला ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

मंगळवारी कणकवलीच्या आठवडा बाजारात ढालकाठीजवळ फळे विकत घेणार्‍या सौ. देवी हुकमाराम प्रजापती (27, मूळ रा. राजस्थान, सध्या कणकवली) यांची पर्स आणि मोबाईल असलेली पिशवी गर्दीचा फायदा घेऊन चोरून पळून गेलेल्या दोन महिलांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. 

ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. सौ. देवी प्रजापती यांच्या पतीचे कणकवलीत कटलरींगचे दुकान आहे. त्या पती व मुलासमवेत मनोहर शिल्प बिल्डिंगमध्ये राहतात. मंगळवारी त्या आठवडा बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. ढालकाठीजवळ फळे घेत असताना त्यांच्याजवळ असलेली कापडी पिशवी बाजूला ठेवली होती. त्या पिशवीमध्ये पर्स होती. त्या पर्समध्ये रोख रू. 700 आणि मोबाईल होता. ती पिशवी  गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेने चोरून पळून जायचा प्रयत्न केला.

हे लक्षात येताच सौ. देवी प्रजापती यांनी त्या महिलेचा पाठलाग केला. मात्र त्या महिलेसोबत असलेल्या दुसर्‍या महिलेकडे तिने पिशवी दिली आणि तीही पळू लागली.  शेवटी सौ. प्रजापती यांनी त्या महिलांसोबत असलेल्या एका मुलीला पकडले आणि कणकवली पोलिस स्थानकात आणले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर त्या दोन महिलांनाही पोलिसांनी सायंकाळी कणकवली पोलिस स्थानकात आणले. त्यांची चौकशी केली असता त्या ताकास तूर लावू देत नव्हत्या. याबाबतची  फिर्याद सौ. देवी प्रजापती यांनी दिली. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.