Sun, Jul 21, 2019 01:50होमपेज › Konkan › कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सिंधुदुर्गनगरीत धरणे

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सिंधुदुर्गनगरीत धरणे

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:37PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्‍वासित व मान्य मागण्यांच्या पूर्ततेची अंमलबजावणी शासनाकडून होत नाही, असा आरोप करत  या न्याय प्रश्‍नी शासनाचे  लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. 

सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष के. जी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष एन. के. साळवी, सचिव डी.जे. शितोळे, प्रा. एच. के. साटम, यु. आर. पाटील यांच्यासह तालुक्यातील संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळ प्रलंबित असून त्याच्या पूर्ततेसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. याबाबत  गेल्या तीन वर्षात झालेल्या बैठकामध्ये शासनाने मागण्या मान्य करून अंमलबजावणी केलेली नाही,  राज्य महासंघास दिलेले फेर आश्‍वासनही आपल्या अधिनस्त अधिकार्‍यांनी न पाळल्यामुळे सर्व शिक्षकांची दिवाळीही अंधारात गेली. हे कमी म्हणून 23 ऑक्टोबरला वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत अन्यायकारक व बेकायदेशीर शासनादेश काढण्यात आला. यामुळे आपल्या विश्‍वासाहर्तेबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

गेल्या चार-पाच वर्षापासून नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना  नियुक्ती मान्यता नाही, त्यामुळे त्यांना विनावेतन काम करावे लागत आहे. शिक्षक  आयुक्त पद निर्माण केल्यापासून तर समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. रिक्त जागांवर नविन नेमणूकांना परवानगी दिली जात नाही.  राज्यात नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. त्यानुसार कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के व तितकीच रक्कम शासनाने टाकणे आवश्यक असताना गेल्या बारा वर्षात एक रूपया  यात दिला नाही. याप्रश्‍नी संबंधित अधिकार्‍यांना अनेक वेळा भेटून निवेदने दिली. परंतू त्यांची अंमलबजावणी नाही. त्यामुळे महासंघाला राज्यात टप्याटप्याने आंदोलने करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.