Thu, Apr 25, 2019 23:33होमपेज › Konkan › गणपतीपुळेला जिंदलमधून पाणी हवे : आ. सामंत

गणपतीपुळेला जिंदलमधून पाणी हवे : आ. सामंत

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:34PMरत्नागिरी : प्रतिनिधी    

गणपतीपुळेच्या 80 कोटींच्या विकास आराखड्यात देऊड गावातून पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे देऊडवासीयांना पाणीटंचाई जाणवू शकेल. देऊडमधून पाणी न आणता जिंदल कंपनीकडून गणपतीपुळेला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी आपली पहिल्यापासून भूमिका असल्याचे आ. उदय सामंत यांनी सांगितले.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या राज्य नियोजनाच्या बैठकीत गणपतीपुळेच्या 80 कोटी विकास आराखड्याचे सादरीकण करण्यात आले. यामध्ये गणपतीपुळेला पाणी देण्यासाठी देऊड येथून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. यामुळे देऊडवासीयांना पाणीटंचाई जाणवू शकेल. जिंदल कंपनीला ‘एमआयडीसी’कडून पाणीपुरवठा होतो. जिंदल कंपनीने सुरुवातीलाच परिसरातील गावांना ‘टॅप’द्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल आणि गणपतीपुळ्याला कंपनीकडूनच पाणी देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कार्यवाही होऊ शकलेली नाही. जिंदलचे पाणी चाफे गावापर्यंत आले आहे. तेथून गणपतीपुळ्यात पाणी आणता येईल. प्रशासनाचे अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेत नाहीत. प्रशासनाने लोकांच्या भावनेचा उद्रेक होईल, असे काम करू नये. गणपतीपुळ्यात मंगळवारी ग्रामस्थांबरोबर विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा नियोजन समितीला शासनाच्या ‘डीपीसी’ बजेटनुसार  2.25 टक्के निधी मिळणे आवश्यक आहे. 2015-16 साली 1 कोटी 29 लाख, 2016-17 साली 12 कोटी 50 लाख आणि 2017-18 साठी 1 कोटी 50 लाखांचा निधी कमी आला होता. मात्र, राज्याच्या निकषानुसार मिळालेला निधी योग्य असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. याच बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील साकवांच्या दुरवस्थेची माहिती देऊन निधीची मागणी केली. जर जिल्ह्याला 7 कोटी 59 लाख दिले तर सर्वच साकव पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.