Sat, Dec 07, 2019 13:58होमपेज › Konkan › ...जेव्हा जिल्हा परिषदेचा इतिहास जागा होतो!

...जेव्हा जिल्हा परिषदेचा इतिहास जागा होतो!

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 10:50PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्ग : गणेश जेठे

निमित्त होते  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला स्थापित होऊन झालेली 25 वर्षे... जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई आणि सर्व विषय समिती सभापती प्रितेश राऊळ, संतोष साटविलकर, सायली सावंत, शारदा कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन सिंधुदुर्गनगरीतील प्रशस्त वातानुकुलित  शरद भवनमध्ये केले होते. अगदी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आर.बी.दळवी यांच्यापासून. सत्ता परिवर्तनानंतर बनलेले जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष माजी आ. राजन तेली यांच्यापर्यंत ते अशोक सावंत, संजय पडते, काका कुडाळकर, विकास कुडाळकर, सुमेधा पाताडे, शोभा पांचाळ आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आताचे  ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांच्यापर्यंत प्रत्येकजण या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाला होता.

बोलता बोलता सदा ओगले यांच्यासारख्या माजी प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी राजकीय चिमटे काढले खरे परंतू शेवटी कार्यक्रम खूपच खेळीमेळीचा आणि भावनिकही बनला. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आयोजक म्हणून वावरतानाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. जिल्हा बँकेने पुरस्कृत केलेली नारळाची रोपे आणि स्मृतीचिन्ह याबरोबरच खास फेटे बांधून जिल्हा परिषदेच्या आजी-माजी सर्व सदस्यांचा गौरव केला गेला. जे आजी-माजी सदस्य आत्ता हयात नाहीत अशांच्या नातेवाईकांचा सत्कार करताना काही वेळा वातावरण भावनिकही बनले. जिल्हा परिषदेच्या विकास प्रक्रियेमध्ये साथ दिलेल्या मुख्यालयातील पत्रकारांनाही यावेळी गौरविण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषदेचा 25 वर्षांचा इतिहास अनेकांच्या बोलण्यातून आणि वावरण्यातून जागा झाला होता.   

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, श्री. पिंगुळकर, भाई कदम, संतोष टक्के यांच्यासह इतर अनेक  अधिकारी व कर्मचारी या सोहळ्यामध्ये सर्वांचाच सन्मान व्हावा या दृष्टीने वावरत होते. सुनिल रेडकर यांनी सभागृहातील शास्त्र सांगणारे एक पुस्तक प्रकाशित केले. त्याचे प्रकाशन  करण्यात आले. पहिला सन्मान जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आर.बी.दळवी यांचा करण्यात आला. 1992 मध्ये लोकनियुक्त जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी पहिला अध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारला होता. सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या कार्यकालातील काही किस्से सांगितले. हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. 1992 ते 1997, 1997 ते 2002, 2002 ते 2007, 2007 ते 2012, 2012 ते 2017 या कालावधीत काम केलेल्या तसेच सध्याच्या जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

सतीश सावंत हे चौथ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्याशिवाय ते जिल्हा बँकेचे उत्कृष्टरित्या काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मानपत्र देऊन  जिल्हा परिषदेकडून गौरविण्यात आले.  सध्याच्या जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत आणि त्यांच्या मातोश्री आणि माजी जिल्हा परिषद सदस्या प्रज्ञा ढवण यांचा सत्कार एकाचवेळी करण्यात आला. विशेष म्हणजे सूत्रसंचालक प्रफुल्ल वालावलकर यांनी या मायलेकींचा एकाचवेळी सत्कार होत असल्याचा आवर्जुन उल्लेख केला. या सत्काराला टाळ्या वाजवून उपस्थितांनी दाद दिली. अगदी वयोवृध्द बनलेल्या माजी शिक्षण सभापती अशोक गावकर यांनीही व्यासपीठावर जाऊन सत्कार स्विकारला. 1992 मध्ये निवडून आलेले भगवान गुरव, अशोक सावंत, सरोज परब आणि जिल्हा परिषदेचे इतर अनेक सदस्य या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. मसुरे भागातून चारवेळा निवडून आलेल्या सरोज परब यांनी भावनिक भाषण करताना मतदारांचे आभार मानले. माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी सत्कार स्विकारल्यानंतर माईक हातात घेऊन जी अनेकांना पदे मिळाली ती केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे मिळाली, असे उद‍्गार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

कणकवली ही ग्रामपंचायत असताना 2002 मध्ये निलम सावंत-पालव या जिल्हा परिषदेवर कणकवलीतून निवडून आल्या होत्या.  त्यांनी मनोगत व्यक्‍त करताना नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख करतानाच आवर्जुन ‘संदेशभाई’ असे म्हणत संदेश पारकर यांच्यामुळे जिल्हा परिषदेत काम करण्याची आपणास संधी मिळाली असे सांगितले. 

भगवान गुरव, जयप्रकाश चमणकर,सदा ओगले ,जान्हवी सावंत, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, कल्पिका मुंज यांनीही जुन्या आठवणी सांगितल्या. पत्रकारांच्यावतीने बाळ खडपकर, देवयानी वरसकर यांनी  जिल्हा परिषद सभागृहातील अनेक आठवणी आवर्जुन सांगितल्या. माजी सभापती नागेश मोरये, एस. टी. सावंत, संदेश पटेल, अंकुश जाधव, सुकन्या नरसुले,  जान्हवी सावंत, आनंदी परब यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अनेक आजी-माजी सदस्यांनी सत्कार स्विकारले. 

सतीश सावंत यांच्या हस्ते राजन तेली यांचा सत्कार 
जिल्हा परिषदेच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी, अधिकारी वगळता इतर कुणालाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे आलेल्या प्रत्येक सदस्यांचा सत्कार अध्यक्षा व इतर पदाधिकारी व ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते करण्यात येत होते. जेव्हा राजन तेली यांचे सत्कारासाठी नाव पुकारले तेव्हा त्यांचा सत्कार करण्याची जबाबदारी योगायोगाने सतीश सावंत यांच्याकडे आली. सत्काराच्या क्षणी दोघांनीही एकमेकांकडे बघत दिलखुलास हास्य दिले, आणि हस्तांदोलन करत आभारही मानले. संपूर्ण सोहळ्यात असेच पक्षविरहीत खेळीमेळीचे वातावरण पहायला मिळाले, आणि अर्थात या सर्व सोहळ्याचे श्रेय अध्यक्षा रेश्मा सावंत यांना दिले जात होते.