होमपेज › Konkan › मालवण बंदर जेटी लवकरच गाळ मुक्त!

मालवण बंदर जेटी लवकरच गाळ मुक्त!

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:18PMमालवण : वार्ताहर

मालवण  बंदर जेटी परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी सायंकाळी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते या गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गाळ काढण्याचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. जेटी परिसरात गाळ वाढल्याने ओहोटीच्या वेळी किल्ला प्रवासी वाहतुकीच्या होड्या जेटीला लावताना कसरत करावी लागत असे. आता गाळ उपसा झाल्या नंतर ही समस्या मिटणार असल्याने कामास सुरुवात झाल्याबद्दल होडी व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.  

बंदर जेटी येथील समुद्रात साचलेल्या गाळ उपश्यासाठी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. तसेच या संघटनेने आ. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. या पाठपुराव्यामुळे आ. नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत नुकतीच मेरीटाईम बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत गाळ काढण्याचे काम तत्काळ हाती घेतले जाईल, असे आश्‍वासन किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आले होते.

सोमवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते  या गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज सादये, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, तृप्ती मयेकर, सेजल परब, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, राजू पराडकर, प्रसाद सरकारे, चंदू सरकारे, बाळू तारी, प्रशांत पराडकर, संजय नार्वेकर, विल्सन फर्नांडिस, फ्रॅन्चू फर्नांडिस आदी उपस्थित होते. 

आ.  वैभव नाईक यांनी  हे काम तत्काळ मार्गी लावल्याबद्दल किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना पदाधिकार्‍यांनी त्यांचे आभार मानले.