Sun, Jun 07, 2020 15:50होमपेज › Konkan › वळचणीला गेलेल्यांना इतिहास नसतो; जयंत पाटलांचा भास्कर जाधवांवर शाब्दिक हल्ला

वळचणीला गेलेल्यांना इतिहास नसतो : जयंत पाटील

Published On: Sep 21 2019 1:32AM | Last Updated: Sep 21 2019 1:32AM

गुहागर : शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करताना गुहागरमधील पदाधिकारी व कार्यकर्ते.शृंगारतळी : वार्ताहर

स्वार्थासाठी सत्तेच्या वळचणीला जे गेले त्यांना इतिहास नसतो. जनतेला सोडून ज्यांनी दगाफटका केला त्यांना तर इतिहासच नाही. परंतु, एवढ्या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी जे उभे राहिलात त्यांना मी मानाचा मुजरा करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेले भास्कर जाधव यांच्यावर गुहागर येथील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शाब्दिक हल्ला चढविला.

ते पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे तुम्ही जाण्याचा विचार करीत होतात. परंतु, तुमच्या पोटातले ओठावर आले नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते. तुम्ही खाली ठेवलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा म्हणून आम्ही हाती घेतला आहे. तो अखेरपर्यंत ठेवू, असे घणाघाती विचार जयंत पाटील यांनी शृंगारतळी येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 20) आयोजित जाहीर सभेत मांडले. ते पुढे म्हणाले, हल्लाबोल  यात्रेच्या निमित्ताने गुहागरमध्ये आलो होतो. मात्र, त्यावेळी आपल्या एका बाजूला खा. सुनील तटकरे तर दुसर्‍या बाजूला शेठ होते. त्यावेळी वाटले होते की, आता प्रतिकूल काळ आहे. सगळे मावळे साहेबांबरोबरच राहतील. जो अडचणीच्या काळात बरोबर राहतो तो शूर मावळा असतो. पण जो पळून जातो तो भित्रा असतो. असे भित्रे लोक शत्रूच्या सैन्यास जाऊन मिळाले आहेत. त्यांना येथून निवडून येऊ असे वाटत नाही त्यासाठीच ते पळून गेले आहेत. लोकसभेत भाजपचा मोठा विजय झाला. त्यामुळे अनेकांना आपल्या भवितव्याची भीती वाटत आहे. आपले काय होणार अशी शंका आहे. ज्यांना पवार साहेबांनी मानसन्मान दिला, मोठी पदे दिली असे अनेकजण त्यांना सोडून गेले. मात्र, अशांना धूळ चारण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे हे लक्षात घ्यायला हवे. गुहागरच्या जनतेने येथील गर्दीतून हे दाखवून दिले आहे.

पापात शिवसेनेचाही सहभाग : खा. डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून या मतदारसंघाचे आमदार तुम्ही ज्या पक्षात गेलात त्याला राष्ट्रीय दर्जा नाही. पवार साहेबांच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा होता, कार्यकर्त्याला एक वेगळा मान होता. ज्या शिवाजी महाराजांची घोषणा करून तुम्ही सत्ता मिळवलीत व  सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करता आहात त्या सरकारने महाराजांचे गडकिल्ले खासगी समारंभासाठी भाडयाने  देण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे तुम्हाला  महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षाचा विकासाचा आलेख मोठया प्रमाणावर खाली आला आहे. त्या पापात शिवसेनाही सहभागी आहे. आदित्य ठाकरे प्रदूषण मुक्त व बेरोजगार मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहत आहेत पण आदित्यजी महाराष्ट्राचे उद्योग खाते तुमच्याच हातात आहे. गुहागरच्या या जनतेच्या तोंडावर दडपणातून दडपशाहीतून स्वतंत्र झाल्याची भावना आहे. हा राग व ही अस्वस्थता तुमच्याशी दगाफटका करणार्‍याला त्याची खरी जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हेही स्पष्ट आहे. 

या सभेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर,  खा. सुनील तटकरे, आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे व गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंगीही हत्तीला भारी पडते...

कुणाच्याही जाण्याने पोकळी निर्माण होत नाही. शेवटी एक मुंगी हत्तीला देखील भारी पडते, असा निसर्गनियम आहे. त्यामुळे या पुढच्या विधानसभा निवडणुकीत नेमके काय करायचे, हे गुहागरमधील जनतेला सांगायला नको. असे सांगतानाच खा. डॉ. कोल्हे यांनी बालकवींची ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील त्याचे कार्य काय’, या कवितेच्या ओळी सादर केल्यावर उपस्थितांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट केला.