Thu, Jan 23, 2020 05:30होमपेज › Konkan › दोडामार्गात ‘जनआक्रोश’ आंदोलन सुरूच

दोडामार्गात ‘जनआक्रोश’ आंदोलन सुरूच

Published On: Mar 21 2018 10:51PM | Last Updated: Mar 21 2018 10:46PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत आंदोलनाला बुधवारी दुसर्‍या दिवशीही हजारोंच्या संख्येने तालुकावासीय उपस्थित राहिले होते. जोपर्यंत ठोस निर्णय मागण्यांवर होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे संयोजक यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

गोवा राज्यातील बांबुळी, म्हापसा जिल्हा रुग्णालयात दोडामार्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांकडून रुग्ण शुल्क घेतले जाते, ते तत्काळ बंद करून विनाशुल्क सेवा पूर्वीप्रमाणे मिळावी, नपेक्षा महाराष्ट्र सरकारने जिल्हावासीयांकडून घेतले जाणारे सेवा शुल्क गोवा सरकारला आदा करावे, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, रिक्‍त वैद्यकीय पदे साधनसामग्री पुरवावी, बांदा किंवा दोडामार्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी ‘आरोग्याचा जनआक्रोश’मध्ये तालुक्यातील हजारो नागरिक एकत्रित आले होते. पहिल्या दिवशी हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी दुसर्‍या दिवशीसुद्धा तालुकावासीयांची उपस्थिती वाढती होती. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्यांची पूर्तता महाराष्ट्र सरकारने करावी, नाही तर आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचे महिलांच्या वतीने सांगण्यात आले. 
 
मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपण मंगळवारी स्वतः आरोग्याचा जनआक्रोश या आंदोलनाबाबत चर्चा केली. शिवाय मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला आहे. ते याबाबत सकारात्मक आहेत. मात्र, सध्या अधिवेशन सुरू असल्याने व्यस्त आहेत. यामुळे आंदोलनस्थळी येऊ शकत नाहीत; पण तुमच्या संयोजकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांनी गुरुवारी वेळ दिला आहे. यासाठी शिष्टमंडळ तयार करा, बुधवारी संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्यात यावी, असे माजी आमदार, भाजप चिटणीस राजन तेली यांनी आंदोलनाच्या भेटीदरम्यान सांगितले.