Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Konkan › मेंढ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा 

मेंढ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा 

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 12:23AMजामखेड : प्रतिनिधी

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावे, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी धनगरांच्या जीवावर जे नेते सत्तेची ऊब घेत आहेत, त्यांनी समाजाला वार्‍यावर सोडून विश्‍वासघात केला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने  निकाली न काढल्यास सत्ताधारी नेत्यांना अद्दल घडविण्यासाठी धनगर समाज मागेपुढे पाहणार नाही, असे म्हणत भाजपा सरकारचे आंदोलनकर्त्यांनी वाभाडे काढले 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आसलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा चौकात धनगर बांधवांच्या वतीने मेंढ्यासह तीन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बाजार समितीतून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. त्यानंतर खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री राम शिंदे यांच्या तालुक्यात होत असलेल्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रशासनाकडून शासनाविरोधात बोलू नये, म्हणून दबाव तंत्राचा वापर केला गेला, तरीही आंदोलनकर्त्यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. 

या वेळी धनगर बांधवांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्‍वासन फसवे निघाले.  त्यामुळे पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. चौंडी येथील पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी जयंती कार्यक्रमात आरक्षण मागितले असता, 54 बांधवांना तुरुंगात टाकले. यापेक्षा दुर्दैव ते काय?  

मोर्चात अहिल्यादेवींचे मूळ वंशज अविनाश शिंदे, डॉ. इंद्रकुमार भिसे, डॉ. भगवान मुरूमकर, मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, रमेश आजबे, अरुण जाधव, अमित जाधव, महेश निमोनकर, विकास राळेभात, मोहन पवार, पांडुरंग भोसले, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, शरद कार्ले, जमीर सय्यद, डॉ. कैलास हजारे, किसनराव चिलगर, अशोक महारनवर, महारुद्र महारनवर, अण्णासाहेब ढवळे, गणेश हुलगुंडे,  उध्दव हुलगुंडे,नितिन हुलगुंडे, सचिन हळनोर, आनंद खरात, रोहित कारंडे, डॉ. साहेबराव कारंडे आदींसह सामाजबंधव उपस्थित होते. 
तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. मोर्चास सकल मराठा समाज, मुस्लिम समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, भटके विमुक्त समाज, नाथपंथी डवरी गोसावी, घिसाडी समाज, कोल्हाटी समाज, शिवसंग्राम पक्ष, माळी समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला.