Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Konkan › .. तरीही जलशिवारच्या कामांना मुहूर्त मिळेना!

.. तरीही जलशिवारच्या कामांना मुहूर्त मिळेना!

Published On: Mar 19 2018 10:37PM | Last Updated: Mar 19 2018 10:10PMकुडाळ : प्रमोद म्हाडगुत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत सिंधुदुर्गातील  कामे अडथळ्यांच्या शयर्र्तीत अडकली आहेत. डिसेंबर महिन्यात सुरू होणारी  जलशिवार अभियानची कामे  आता मार्च अखेर आला तरी  लालफितीत खोळंबली आहेत. परिणामी सन 2017-18 साठी प्रस्तावित  800 कामे  होणार का ? याबाबत सांशकता आहे.

2014 मध्ये  राज्य सरकारने राज्यभर जलयुक्‍त  शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या योजनेकडे डोळसपणे पाहून ही योजना यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. पहिल्या  वर्षी या  योजनेचे राज्यभर  चांगले फलित दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जलशिवार योजनेतंर्गत चांगली कामे सुरूवातीच्या टप्प्यात झाली. मात्र, चालू वर्षी सिंधुदुर्गात या योजनेला  प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून येत आहे. याला कारण म्हणजे सुशेगात प्रशासकीय यंत्रणा  किवा  राजकीय अनास्था. 

पाणलोट विकासाची कामे, साखळी, सिमेंट, नाला बांधांची खोलीकरण आणि रूंदीकरणासह जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन, केटी बंधार्‍यांची दुरूस्ती, पाझर तलाव, सिंचन तलाव दुरूस्ती, पाझर गाव, साठवण, शिवकालिन,  ब्रिटिशकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे आदी कामे या योजनेतून प्राधान्याने प्रस्तावित  आहेत.  यासाठी कृषि, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेकडील कृषी व लघुसिंचन, पाणीपुरवठा, भुजल सर्व्हेशन व विकास यंत्रणा, स्वच्छता अशा जिल्हास्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय राखून हे अभियान सुरू आहे. या अभियानातंर्गत सिंधुदुुर्ग जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये जलयुक्‍त शिवार योजनेतून 494 कामाकरिता  6 कोटी 30 लाख 23 हजार रू. तर सन 2016-17 मध्ये 17 कोटी39 लाख 29 हजार रू. खर्च  करण्यात आले.

पहिल्या दोन वर्षांत या योजनेतून  चांगल्याप्रकारे कामे झाली असल्याचा दावा संबंधित यंत्रणेकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या योजनेमुळे  जिल्ह्यातील सिंचन  क्षमतेत वाढ होवून  शेती उत्पन्‍न  वाढल्याचे सांगितले जाते.  सन 2017-18 या वर्षाकरिता 800 कामे निश्‍चित करण्यात आली. यामध्ये  कणकवली उपविभागात देवगड 20, वैभववाडी 35, कणकवली 162, मालवण 63  अशी मिळून 280 कामे तर सावंतवाडी उपविभागातील कुडाळ 207, वेंगुर्ला 17, सावंतवाडी 236, दोडामार्ग 60 अशी 520 मिळून एकूण कणकवली व सावंतवाडी  उपविभागात 800 कामे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्या कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. डिसेंबर  महिन्यात वास्तविक  या कामांना सुरूवात होते. पण चालूवर्षी  मार्च  अखेर आली तरी त्या कामांना सुरुवात झालेली नाही.  संबंधित  यंत्रणेशी याबाबत संपर्क साधला असता 800 पैकी 99 कामांना  प्रशासकीय मान्यता  मिळाली आहे. यानंतर निविदा घेवून  कार्यारंभ आदेश मिळेल आणि ती कामे सुरू होतील, असे  सांगितले गेले.  मात्र सरकारी  यंत्रणेकडून  अशाचप्रकारे  कागदी सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया राहिली तर चालू वर्षी  या कामांना गती मिळण्याची शक्यता कमी आहे.

 

Tags : jalyukt shivar work kudhal