होमपेज › Konkan › निकषांच्या अडचणीने सिमेंट बंधारे कागदावरच

निकषांच्या अडचणीने सिमेंट बंधारे कागदावरच

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 10:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जलयुक्‍त शिवार योजनेचे निकष कोकणच्या भौगोलिक स्थितीनुसार प्रतिकूल असल्याने चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकही सिमेंट बंधार्‍याचे काम झाले नसल्याने हे बंधारे कागदावरच राहिले आहेत. यासंदर्भात निकष बदलण्याची मागणी करण्यात आली असून त्याबाबत अनुकूलता प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा  कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली. 

शासनाने जलयुक्‍त शिवारसाठी लागू करण्यात आलेले निकष कोकणासाठी प्रतिकूल ठरले आहेत. यामध्ये सिमेट बंधारा उभारताना बंधार्‍याच्या मागे साठवण क्षेत्राचा परिघ सुमारे दोन कि.मी.चा असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, कोकणाच्या भोगोलिक स्थितीनुसार असा परिघ अपवादात्मक असल्याने चालू आर्थिक वर्षात एकही सिमेट बंधार्‍याचा प्रस्ताव पारित झाला नाही.  कोकणातील चारही जिल्ह्यांत भौगोलिक स्थिती  अडचणीची असल्याने हे निकष बदलण्याची मागणी कोकणातील चारही जिल्हा प्रशासनांनी नोंदविली होती. त्यामुळे हे निकष बदलण्याची प्रतीक्षा प्रशासनांना आहे. मात्र, त्यामुळे या वर्षी एकही सिमेंट बंधारा जिल्ह्यात झालेला नाही. निधीमध्येही तरतूद करताना तुटपुंजी असल्यामुळे सिमेंट बंधार्‍यांचा ताळमेळ कोकणात बसू शकत नाही. 80 हजारांत बंधारा उभारण्यात तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. कोकणाच्या भौगोलिक स्थितीत येणारा खर्च लक्षात घेता सिमेंट बंधार्‍याचे निकष बदलण्याची मागणी कोकणातील प्रशासनाने केली असल्याची माहिती कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली.