Tue, Aug 20, 2019 05:14होमपेज › Konkan › जलयुक्‍त शिवारांना ‘सिद्धिविनायका‘चा आशीर्वाद

जलयुक्‍त शिवारांना ‘सिद्धिविनायका‘चा आशीर्वाद

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:33PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्या सोडवण्यासाठी सिद्धिविनायक पावला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक न्यासाने कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी जलयुक्‍त शिवार योजनेकरिता साडेबारा कोटींचे अर्थसहाय्य करून वरदहस्त ठेवला आहे. यातून कोकणातील 2334 गावातील जलयुक्‍त शिवारच्या योजनांची अंमलबजावणी करता येणार आहे. अलीकडेच हा निधी विश्‍वस्त संस्थेने सुपूर्द केला असून कोकणातील जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुंबई येथील प्रभादेवीतील  सिद्धिविनायक न्यास नेहमीच सामाजिक जाणीवेतून कोकणातील जिल्ह्यांसाठी आर्थिक मदत करीत आला आहे. सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून अलीकडेच कोकणातील रुग्णालयातील गरजू रुग्णांना न्यासातर्फे अर्थसहाय्य  देण्यात आले. श्री सिद्धीविनायक न्यासातर्फे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील जलयुक्‍त शिवार अभियानासाठी प्रत्येकी एक कोटी असा पाच कोटींचा निधी गतवर्षी दिला होता.

यावर्षीही सिद्धिविनायक ट्रस्टने कोकणातील जिल्ह्यांतील पाण्याच्या योजना राबवण्यासाठी सढळ हस्ते मदत केली आहे. जलयुक्‍त शिवारसाठी कोकणातील जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचे तसेच पाणी टंचाईची समस्या निवारताना कोकणातील गावे टँकरमुक्‍त करण्यासाठी हे अर्थसहाय्य न्यासाने दिले आहे. 

यामध्ये जलयुक्‍त शिवार योजनेत कोकणातील 234 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी सव्वादोनशे कोटींचा आराखडा तयार करणण्यात आला आहे. यामध्ये सिद्धिविनायक ट्रस्टचे साडेबारा कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देताना प्रत्येक जिल्ह्यासाठी अडीच कोटींचा निधी दिला आहे. 

आतापर्यंत ट्रस्टने या योजनेत 70 कोटींपेक्षा जास्त अर्थसहाय्य केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान एक कोटीची मदत करण्यात आली आहे. मात्र, कोकणातील योजनासाठी ट्रस्टने सढळ हस्ते निधी वितरित करताना कोकणातील पाण्याच्या योजनांसाठी पुढाकार घेताना निधी उपलब्ध करून दिला आहे. सिद्धिविनायक न्यासाच्या या पुढाकारामुळे आता कोकणातील जलयुक्‍त शिवार योजनेला गती मिळणार आहे.