Mon, Mar 25, 2019 05:23
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › पोलिसांची दंडेलशाही; नाटेत मूकमोर्चा

पोलिसांची दंडेलशाही; नाटेत मूकमोर्चा

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:46PM

बुकमार्क करा
जैतापूर : वार्ताहर

राजापूर तालुक्यातील नाटे येथे नाटेनगर विद्यामंदिराचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री सुरू असताना सागरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी दंडेलशाही करत कार्यक्रम बंद पाडले. त्याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांच्यावतीने नाटे येथे मूकमोर्चा काढण्यात आला. 

नाटेनगर विद्यामंदिर ही नाटे ग्रामपंचायत चालवित असलेली जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. असे असतांना समंजस भूमिका न घेता केवळ दंडेलशाहीने मुलांचे कार्यक्रम बंद पाडल्याच्या रागातून नाटे ग्रामस्थ, संस्थाचालक, ग्रामपंचायत समितीने व नाटे व्यापारी संघाने बुधवारी बाजार पेठ बंदचे आवाहन करून नाटे सागरी पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा काढला.तसेच निषेध म्हणून शाळा देखील भरविण्यात आली नाही.

संस्थेचे चेअरमन संजय बांधकर यांनी पोलीस नशापान करून दंडेलशाही करत होते, असा आरोप केला आहे. तसेच बेकायदेशीर धंद्याचा मोठा व्यवसाय करतात,  त्यांना अभय दिले जात आहे. मात्र मुलांच्या कार्यक्रमाला बंदी घातली गेल्याने नाराजी व्यक्त केली. नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचे संजय बांधकर यांनी सांगितले. यापुढे रात्री 10 वाजल्यानंतर डीजे किंवा स्पिकर लागल्यास पोलिस काय करतात पाहू?असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

नाटे विभागातील यांत्रिकी नौका व इतर बेकायदेशीर धंद्यामधून सुमारे दहा लाख रूपये हप्ता  नाटे पेलिसांना मिळत असल्याचा आरोप डॉ. सुनिल राणे यांनी केला असून मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा हप्ता हवा होता तर आम्ही दिला असता, असे खोचक वक्तव्य केले. यावेळी जि.प. शिक्षण व अर्थ सभापती दीपक नागले यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. 

घडल्याप्रकारामुळे पंचक्रोशीमपोलिस ठाण्याबाबत निषेध व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या अगोदर जैतापूर हायस्कूल, सागवे येथील मंदिराचा वाद पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या मनमानी व दंडेलशाहीमुळेच झाल्याचे बोलले जात असून नाटे येथे पदभार स्विकारल्यापासून एकाही दारूधंदा, मटकाधंदा, बेकायदेशीर गांजा, गुटखा, वडाप व्यावसायिकांवर कारवाई केली नसल्याचे पुढे आले आहे.

काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सरपंच नाटे योगीता खांबल,उपसरपंच पुरूषोत्तम थळेश्री, माजी सरपंच तथा नाटे नगर विद्यामंदिर चेअरमन संजय बांधकर, शिक्षण सभापती दीपक नागले, शिवसेना माजी विभागप्रमुख डॉ. सुनिल राणे, विभागप्रमुख नरेश शेलार, व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज आडविरकर, वसंत शहाणे,महेश कोठारकर, स्वाभिमान पक्षाचे बंडू वर्दम,  भूषण नार्वेकर, रिक्षा संघटना अध्यक्ष विलास दसूरी,  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.