Mon, May 27, 2019 08:54होमपेज › Konkan › ‘जैतापूर’ विरोधात जेलभरो

‘जैतापूर’ विरोधात जेलभरो

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 9:44PMजैतापूर : वार्ताहर 

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनहक्‍क सेवा समितीच्या वतीने सोमवारी जैतापूर येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले असून, शिवसेनेने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. या आंदोलनात असंख्य प्रकल्पग्रस्तांनी सहभागी होत विरोध दर्शवला. यावेळी आ. राजन साळवी यांच्यासह अनेक आंदोलकांना अटक करण्यात आले.

सोमवार (दि. 27)  ऑगस्ट रोजी अणुऊर्जा प्रकल्पस्थळी सोनार गडगा या भागात जनहक्‍क सेवा समितीने जेलभरो आंदोलन छेडले होते. आंदोलनाच्या मुळे परिसरात कलम 144 अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आला होता. सकाळी 11 वा. च्या सुमारास तबरेज चौकापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

शिवसेनेसह ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अणुऊर्जा प्रकल्प रेंगाळला आहे. प्रकल्पाच्या विरोधात सातत्याने शिवसेनेने शेतकरी आणि मच्छीमारांसह आंदोलने छेडली आहेत. आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनहक्‍क सेवा समिती आंदोलन छेडले आहे. प्रकल्पाचे कागदावर करार होत असले तरी प्रकल्पस्थळी हा प्रकल्प रेटून नेण्यात पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजप सरकारला अपयश आले आहे, असे प्रत्येक वक्‍ता आपल्या बोलण्यातून सांगत होता. प्रकल्पाच्या विरोधात असलेला हा लढा कायम सुरू राहावा, या उद्देशानेच जेलभरो आंदोलन छेडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार या जेलभरो आंदोलनात करण्यात आला आहे.

जनहक्‍क सेवा 

समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, मन्सूर सोलकर, अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर आदींनी विचार मांडले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई केली असून, आ. राजन साळवी यांच्यासह  सत्यजित चव्हाण, मन्सूर सोलकर, अमजद बोरकर, अलिमिया म्हसकर, प्रकाश कुवळेकर, दीपक नागले, अभिजित तेली, प्रशांत गावकर व अनेक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. 20 एस.टी. बसमधून या आंदोलकांना तालुक्याच्या ठिकाणी नेण्यात आले. या आंदोलनामुळे नाटे बाजारपेठ अर्धा दिवस बंद ठेवण्यात आली होती.