Thu, Apr 25, 2019 13:52होमपेज › Konkan › जैतापूर ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

जैतापूर ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 8:31PMजैतापूर : वार्ताहर 

राजापूर तालुक्यातील जैतापूर नळपाणी योजनेचे तीन तेरा वाजले असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे. पाणी नसल्याने वाहनांद्वारे येणारे पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. आठ वर्षे ही नळपाणी योजना बंद असून ती सुरू करण्यासाठी प्रयत्नच होत नसल्याचे पुढे आले आहे. 

जैतापूर गावची नळपाणी योजना 9 कि.मी.वर असवेल्या निवेली गावातून सुरू होते. निवेली गावात खडतर जंगल भागातून बारमाही वाहणार्‍या गोड्या पाण्याच्या नाल्यावरच जैतापूर नळपाणी योजनेची विहीर आहे. या विहिरीला मुबलक पाणी आहे. पण जीर्ण झालेल्या पाईपलाईनमुळे पाणी जैतापूरपर्यंत पोहचू शकत नाही.आजच्या परिस्थितीत पंप हाऊसची रूम, विजेची जोडणी याची दुरवस्था झाली आहे. तसेच विहिरीची दुरूस्ती आवश्यक आहे. तसेच हजारो रूपयांचे जुने पंप जागेवरच सडून गेले आहेत. जैतापूर गावात पिण्याचे पाणी गेली 8 वर्षे नळाद्वारे आलेलेच नाही. 

सन 1981 साली रामचंद्र मांजरेकर, गोविंद मांजरेकर, नारायण कोंडेकर, केदारीभाऊ आडविरकर, मंगलदास करगुटकर, कै.बाळकृष्ण करंगुटकर, नरेंद्र नारकर, भास्कर श्रीरंग मांजरेकर, ग.द.फणसे, गुलाम हुसैन काझी यांच्या प्रयत्नाने ही योजना कातळी भागातून खडतर प्रयत्नाने सुरू झाली होती. 35 वर्षे जुनी पाईपलाईन झालेल्या नळातून दहा वर्षे पाणी वेळी-अवेळी येत होते.आता संपूर्ण योजनेला दुरूस्ती अभावी गेली आठ वर्षे पूर्ण विराम मिळाला आहे. बाजारवाडी भागातील सर्वच विहिरींच्या पाण्याची चव बदली आहे.

गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात सक्षम व खंबीर नेतृत्व नसल्याने गावात अनेक सुविधा रखडल्या आहेत. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांनी आपली सुट्टीच्या कालावधीतील राहण्याची सोय जिल्हा व तालुका पातळीवर केली आहे. तसेच जैतापुरातील शासकीय व निमशासकीय लोकांनी जैतापूर सोडून अन्य ठिकांणी राहण्याची सोय केली आहे. 

पाण्यासाठी वणवण करावी लागणार्‍या या गावाची आमदार-खासदारांनी दखल घेतलीच नाही. आता ग्रामस्थच  ही योजना नव्याने उभारण्यासाठी अणुऊर्जा महामंडळाकडे हात पसरणार आहेत असे विश्‍वसनीय वृत्त आहे. नुकत्याच शेजारील नाटे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी ठराव करून अणुऊर्जा महामंडळाकडे दोन साकवांकरिता पंचाहत्तर लाखांचा निधी मागितला आहे. जैतापूर वगळता वेगवेगळ्या गावांनी अणुऊर्जा महामंडळाकडून आर्थिक लाभ घेऊन आपल्या गावचा विकास केला आहे. त्यात जैतापूरच मागास राहिल्याचे चित्र दिसत आहे.

जैतापूर गावात वाडी-वाडीत पिण्याचे पाणी 130 ते 150 रूपयांना 500 लिटर मिळत आहे. तेदेखील पाणी नंबरप्रमाणे टेम्पोने दिले जाते. जैतापूर नळपाणी योजना सुरळीत होण्याकरिता आतापर्यंत गेल्या 15 वर्षांत ठोस प्रयत्न करण्यात ग्रामपंचायतीला अपयश आले आहे. सन नोव्हेंबर 2017 पासून नवीन ग्रामपंचायत कमिटी अस्तित्वात आली.  निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जैतापूर नळ पाणी योजना पूर्ण करण्याचे वचन देऊन निवडणुका लढविल्या आहेत. परंतु, आजपर्यंत संपूर्ण गावाकरिता नळपाणी योजना राबविण्यात आलेली नाही. नवीन ग्रामपंचायत कमिटी उच्चशिक्षित असून त्यांच्याकडून ग्रामस्थांच्या नळपाणी योजना नव्याने सुरू होण्याकरिता फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे ही नळपाणी योजना कधी सुरू होणार? याची उत्सुकता ग्रामस्थांना आहे.