Fri, Jul 19, 2019 22:14होमपेज › Konkan › ‘जेलभरो’चा जिल्हा मराठा समाज बैठकीत निर्धार

‘जेलभरो’चा जिल्हा मराठा समाज बैठकीत निर्धार

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 11:07PMओरोस : प्रतिनिधी

मराठा अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी मतभेद, पक्षभेद विसरून आरक्षणासाठी एकत्र लढू या, आताच झालेल्या आंदोलनात पोलिसांनी 26 मराठा बांधवांवर गुन्हे दाखल केले असले, तरी ही यादी 2600 हून अधिक करून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी राजमार्ग, गनिमी काव्याने लढू या. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’ चा नारा देत ‘जेल भरो’ आंदोलन छेडू या, असे आवाहन  मराठा संघटनेचे अ‍ॅड. सुहास सावंत यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथे मराठा आरक्षण मुद्द्यावर आयोजित बैठकीत ते बोलत होते.  पुष्पसेन सावंत, विक्रांत सावंत, सतीश सावंत, अशोक सावंत, जान्हवी सावंत, धीरज परब, बाबा परब, भाई सावंत आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.

अ‍ॅड. सावंत म्हणाले, कसाल, ओसरगाव येथे झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेमुळे मराठा आंदोलनकांवर 307 सह 341, 353, 332 अशी कलमे लावली आहेत. शासनाने मराठा आंदोलनांतर्गत दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गुन्ह्यातील आरोपींची टेबल जामिनावर मुक्‍तता केली जाणार आहे. यासाठी आंदोलकांनी घाबरून जावू नये.  ओसरगाव येथील बंद कालावधीत घडलेल्या घटनेनंतर  कानसळीवाडीतील तरूण घाबरून गेले आहेत. त्यांना धीर देण्यासाठी आपण सर्वांनी जावून पाठिशी राहू या. या घटनेमधील  चार जणांवर अटकेची कारवाई झाली. अन्य 26 ची यादी पोलिस अधीक्षकांनी जाहीर केल्या नंतर त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी मराठा समाजातील वकिलांचे पथे तैनात आहे. आंदोलनातील गुन्हा म्हणजे गुन्हेगार नाही. त्याचेवर अटकेची कारवाई होवू नये यासाठी खा. विनायक राऊत,  आ. वैभव नाईक यांच्यासह आपण पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.  गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही पोलिस अधीक्षकांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. यापुडे आंदोलनाचा टप्पा तीव्र करताना 9 ऑगस्ट रोजी  जिल्हाभरात  मराठा  बांधव जेलभरो आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आरक्षणाची मागणी धगधगती ठेवण्यासाठी या आंदोलनात सर्व मराठा बांधवांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

विक्रांत सावंत म्हणाले, 26 मराठा बांधवांवरील कारवाई ही क्रांतीकारकांवरील कारवाई आहे.  राज्यभरात आरक्षण मुद्यावर आंदोलने सुरूच असून 1 ऑगस्ट किंवा 9 ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा प्रयत्न राज्यस्तरावर सुरू आहे. जे आंदोलकांवर गुन्हे, केसेस होतील त्यांच्या पाठिशी आपण उभे राहूया. ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना धीर देवू या. काही मराठा बांधव शासयकीय नोकरीत पोलिस व अन्य पदावर आहेत त्यांनीही या आंदोलनाला सहकार्य करावे. मराठा समाजाच्या आंदोलनाला महत्व काय याची जाणीव ठेवावी. कालच्या घटनेत मारहाणीसाठी मराठा समाजातीलच काही पोलिस कर्मचारी पुढे होते, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. आरक्षणासाठी तालुक्या तालुक्यात जेलभरो करूया, असे आवहन त्यांनी केले. 

सतीश सावंत म्हणाले,  घडलेल्या घटनेचा निषेध करत आम्ही समाजाच्या आरक्षणासाठी लढलो. 307 कलमासाठी घाबरून जाणार नाही. गनिमी काव्याने लढू. आरक्षण मुद्यावर मराठा समाजाचे 58 मूक मोर्चा राज्यभरात झाले. आता ठोक मोर्चाची हाक द्यायला सरकारच जबाबदार आहे. कसाल येथील घटनेतील 26 जणांच्या पाठीशी आम्ही उभे राहून त्यांना सर्वश्री मदत करू.  9 ऑगस्ट रोजी आगळे वेगळे जेलभरो आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, यासाठी तीन चार वेगवेगळ्या टीम तयार करा, पुरूषांबरोबर महिलांनीही मोठ्या संख्येने या जेलभरोमध्ये सहभागी व्हा. उद्या या जेलभरोचे केंद्र शासनालाही दाद घ्यावी लागेल यादृष्टीने नियोजन करूया. मराठा आंदोलनाचा द्वेष कोणी करू नये, पक्षभेद विसरून सर्वांनी मराठा एकत्र येवूया.

पुष्पसेन सावंत म्हणाले, ज्यासाठी आपण लढतो त्याची तीव्रता कमी होता नये. 307 कलम आतापर्यंत कित्येकवेळा बघितले, यापूर्वीही अनेक मोर्चे आंदोलनेतील आपल्याला न्याय मागण्यांसाठी राजमार्गाने लढूया, पोलिसांच्या त्रासाला अडकून न जाता जेलभरो सारखी आंदोलन करून पोलिसांच्या गाडी कमी पडतील ,असे आंदोलन करूया. मैदान सोडून पळून जाणारे आम्ही नाही, हे एकीने दाखवून द्या. यावेळी  अशोक सावंत, प्रभाकर सावंत, प्रवीण सावंत यासह आदींची भाषणे झाली.