Wed, Dec 11, 2019 10:30होमपेज › Konkan › कुडाळमध्ये विरोधी पक्षांचे जेलभरो

कुडाळमध्ये विरोधी पक्षांचे जेलभरो

Published On: Jul 17 2019 2:06AM | Last Updated: Jul 16 2019 11:39PM
कुडाळ ः शहर वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाकडे शासनाने दुर्लक्ष केले, असा आरोप करीत भाजप-शिवसेनेचे युती शासन व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देत जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ एस. एन. देसाई चौकात एकत्र जमत पोलिस स्थानकापर्यंत रॅली काढत जेलभरो आंदोलन केले. 

आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सावंतवाडी शिवसेना नगराध्यक्ष बबन साळगांवकर, राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर,  जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई, काँग्रेस प्रवक्‍ते काका कुडाळकर, अण्णा केसरकर, स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हाध्यक्ष धीरज परब, स्वाभिमानचे आनंद शिरवलकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, नगरसेविका संध्या तेरसे, प्रज्ञा परब, अस्मिता बांदेकर, रेश्मा सावंत, दीपलक्ष्मी पडते, मनीष दळवी, भास्कर परब आदींसह आंदोलनात सहभागी विविध पक्षांमधील 264 पदाधिकारी कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई केली. आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली 180 पोलिसांची फौज तैनात होती. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाकडे युती शासनाने पूर्णतः डोळेझाक केली. परिणामी गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातामध्ये अनेकांचे बळी गेले. याविरोधात केलेले आंदोलन सत्‍तेच्या जोरावर बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पालकमंत्री ना.केसरकर यांनी सुध्दा गांभीर्याने याकडे पाहिले नसल्याने सिंधुदुर्गातील जनतेचा उद्रेक झाल्याने आठ दिवसांपूर्वी काँग्रेस,राष्ट्रवादी व मनसेने  जेलभरो आंदोलनाचे नियोजन  केले. त्यानुसार मंगळवारी कुडाळ येथील एसएन देसाई चौकात विरोधी पक्ष व संघटनांनी आंदोलनाकरिता हजेरी लावली.या आंदोलनात दीड-दोन हजार लोकांची उपस्थित करू असे आयोजकांकडून सांगितले जात होते. मात्र आंदोलनात अपेक्षित उपस्थिती दिसून आली नाही.दुसरीकडे कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी जवळपास 180 पोलिसांची फौज सोबत घेवून आंदोलन स्थळी धडक दिली. मंगळवारी 11.45 वा.च्या सुमारास आंदोलकांनी आपली भाषणे सुरू केली. आयोजकांच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत यांनी सुरूवातीलाच प्रास्ताविक केले व हायवेवर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्याची विनंती केली. त्यानुसार उपस्थित सर्वांनी श्रध्दांजली वाहिली.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत मी गेली 20 वर्षे होतो. मागील पाच वर्षात ते मंत्री झाले. त्यानंतर जनतेला अपेक्षीत असे ते काम करतील, जिल्ह्याचे प्रश्‍न सुटतील, मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील, जनतेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल अशी अपेक्षा होती, मात्र जिल्हावासीयांचा त्यांनी भ्रमनिरास केला. ज्या मतदारसंघातून निवडून येऊन ते मंत्री झाले त्या मतदारसंघातील सुध्दा प्रश्‍न सुटले गेले नाहीत. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तर त्यांच्याकडे वेळच नाही. सावंतवाडीतील अनेक प्रश्‍नांबाबत मी स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र ते प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. त्यामुळे आज आपण जनतेच्या प्रश्‍नासाठी या आंदोलनात सहभागी झालो आहे. सत्‍ताधार्‍यांकडून अपयश दाबण्याचा प्रयत्न झाल्यास यापुढे जिल्ह्यात अशीच आंदोलने उभी राहतील आणि त्यात आपण सहभागी होणार असल्याचे ठणकावून सांगितले. 

स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्‍ता सामंत म्हणाले, हायवेच्या दुरावस्थेबाबत कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी आंदोलन करून आवाज उठवला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्ष प्रथमच एकत्र आले आहेत. विकास सावंत व अमित सामंत हे दोघे सोडले तर याठिकाणी उपस्थित असलेलो आम्ही सर्वजण शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. बबन साळगांवकर पालकमंत्र्यांसोबत होते, मात्र आज ते बाजुला गेले आहेत. पालकमंत्र्यांच्या कार्यपध्दतीबाबत ते जाहीर बोलल्याने शिवसैनिकांकडून त्यांच्यावर नाहक टीका होऊ लागली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पालकमंत्री केसरकर व आ. वैभव नाईक यांना काय कळणार? नितेश राणे यांनी आंदोलन केल्यानंतर खुद्द पालकमंत्र्यांनीच आ. राणेंचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे जाहीर सांगून समर्थन केले. आ. राणे यांच्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात  सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्‍ताधार्‍यांविरोधात आवाज उठवला आहे. विरोधकांची ही एकजूट यापुढेही कायम राहील. जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार, आमदार व पालकमंत्री यांना आता हद्दपार करूया. आंदोलन शांततेने केले जाईल. मात्र याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही न झाल्यास आम्ही सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकत्र बसून निर्णय घेत आमच्या स्टाइलचा वापर करू असे सांगितले.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले, यापूर्वी काँग्रेसची सत्‍ता होती, मात्र काँग्रेसने सत्‍तेचा वापर कधीही आंदोलने चिघळण्यासाठी केला नाही किंवा जनतेला आंदोलन करण्यास भाग पाडले नाही. पालकमंत्री केसरकर व आ. नाईक ही मंडळी काँग्रेसच्या मुशीत घडूनही फुकट गेली. आम्ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलेलो नाही तर जनतेच्या प्रश्‍नांसाठी एकत्र आलोत.आज हायवेची दुरवस्था झाली. या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले ही पुढील आंदोलनाची नांदी असल्याचे सांगितले.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आ. नितेश राणे यांनी आवाज उठवला. महामार्ग, राज्य, ग्रामीण मार्ग समस्याग्रस्त बनले असून जनतेत चीड निर्माण झाली आहे. अकार्यक्षम पालकमंत्र्यांनी  आज विरोधकांना एकत्र येण्याची संधी दिली. महामार्गाच्या दुरावस्थेत पालकमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांचा प्रशासनावर अंकुश नाही, ते वेळोवेळी सांगतात ते मुळात काहीच करत नाहीत. जे ठेकेदार काळ्या यादीत आहेत तेच त्यांच्या गाडीतून फिरत असतात. कणकवलीसारख्या जनतेच्या प्रश्‍नांबाबत पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले जातात. मात्र जिल्ह्यात घरफोड्या, खून, आंबोलीत प्रेते आणून टाकली जातात त्यांचा छडा लागत नाही. यावर ना.केसरकर यांना लक्ष द्यायला वेळ नसल्याची खंत व्यक्‍त केली. 

मनसेचे माजी आ.परशुराम उपरकर म्हणाले, हायवेची वाताहात झाली हे सत्‍ताधारी खासदार, आमदार, पालमंत्र्यांचे अपयश आहे. सरकार ही असंवेदनशील आहे. त्यामुळेच जनतेच्या प्रश्‍नांबाबत सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत हे जेलभरो आंदोलन उभारले आहे. कणकवलीत प्रथमच आंदोलनाच्या अगोदर पालकमंत्र्यांनी हायवेची पाहणी केली.गेल्या पाच वर्षात काय जिल्ह्याचा विकास केला? ते त्यांनी जाहीर सांगावे, आम्हीही जिल्ह्यातील समस्यांचा पाढा वाचू. जिल्हाधिकार्‍यांनी मनाई आदेश लागू केला. सरकारने यातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्र्यांच्या गेल्या पाच वर्षातील समस्यांचा आम्ही पुढील दोन महिन्यात पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला.

काँग्रेस प्रांतिक सदस्य काका कुडाळकर म्हणाले, कुडाळमधील हायवे प्रश्‍नाबाबत आम्ही बचाव समितीच्या माध्यामातून आवाज उठवला. पालकमंत्र्यांना अधिकार्‍यांच्या समवेत बैठक घ्या,अशी विनंती केली. मात्र त्यांना वेळ मिळाला नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनाही विनंती केली पण प्रश्‍न सुटला नाही. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास खासदार, आमदार, पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच आज हे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. हा सिंधुदुर्ग पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण होऊन आगामी काळात युती सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत, अण्णा केसरकर यांनीही सत्‍ताधार्‍यांवर टीका केली.

आंदोलनात प्रफुल्‍ल सुद्रिक, बाळा गावडे, विजय प्रभू, बाबली वायंगणकर, बाळा कनयाळकर, आर.के.सावंत, शिवाजी घोगळे, महादेव बोर्डेकर, संतोष नानचे, प्रज्ञा परब, राजन दाभोलकर, वामन कांबळे, नितीन कुबल, नम्रता कुबल, आबा धडाम, राजू कासकर, आशिष सुभेदार, दीपक नारकर, संजू परब, अस्मिता बांदेकर, संतोष आंगरे, पंढरी राऊळ, सुभाष मडव, संध्या तेरसे, संजय वेंगुर्लेकर, सावळाराम अणावकर, मोहन सावंत,प्रसाद गावडे, विनायक राणे, प्रतिभा घावनळकर, सुरेश सावंत, बाबल गावडे, दादा साईल, पप्पा तवटे, भाजपचे अरविंद परब आदींसह रिक्षा संघटना,ट्रक चालक मालक संघटना व डंपर मालक संघटना यांचा सहभाग होता.