Sat, Dec 14, 2019 03:20होमपेज › Konkan › ‘जगबुडी’ची डागडुजी युद्धपातळीवर

‘जगबुडी’ची डागडुजी युद्धपातळीवर

Published On: Jul 01 2019 1:11AM | Last Updated: Jun 30 2019 10:23PM
खेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नजीक जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोडरस्ता खचल्याची शनिवारी जनप्रक्षोभ उसळला होता. यामुळे रविवारी महामार्ग बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांनी पुलाचा जोडरस्ता वाहतुकीस सुरक्षित बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात पावसाने रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी बांधकाम विभागाची लगबग सुरू होती.

खेड तालुक्यातील भरणे नजीक जगबुडी नदीवरील जुन्या ब्रिटिश काळातील पुलाला पर्याय म्हणून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता शनिवारी धोकादायक परिस्थितीत खचल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यात जुन्या  धोकादायक ब्रिटिश कालीन पुलाला पर्याय म्हणून या मार्गावरून वाहतूक सोडण्याची लगबग प्रशासनाची होती. परंतु नवीन पुलाच्या जोड रस्त्याचा दर्जा तीन दिवसात दिसून आल्याने नागरिक, राजकीय नेते संतप्त झाले. राष्ट्रवादी, मनसे यांनी आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता सुरक्षित करण्यासाठी रविवारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग व संबंधीत ठेकेदाराने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने काम पूर्ण होऊन नवीन पूल व सुरक्षित जोडरस्ता देखील बनवण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.