Wed, Apr 24, 2019 07:44होमपेज › Konkan › ‘...ही तर डिजिटल इंडियाकडे वाटचाल’

‘...ही तर डिजिटल इंडियाकडे वाटचाल’

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:50PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

कर चुकवणार्‍यांना सरकारकडून पायबंद घातला गेला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत भर पडेल. कृषी, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी आहेत. अर्थसंकल्पाचा विचार केला तर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत, असे मत ज्येष्ठ सीए जयंत पित्रे यांनी व्यक्‍त केले.

करसल्लागार संघटना रत्नागिरी जिल्हा या संस्थेतर्फे अरुअप्पा जोशी स्मृती व्याख्यान स्वयंवर मंगल कार्यालय येथे झाले. यावेळी मुंबईतील ज्येष्ठ सीए जयंत पित्रे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे सोप्या भाषेत विश्‍लेषण केले. या तरतुदींचे देशावर चांगले दूरगामी परिणाम होतील, असेही त्यांनी सांगितले. पित्रे यांनी अर्थसंकल्पातील नव्या तरतुदी व त्यांचे होणारे दूरगामी परिणाम मांडले. शेतकरी व सर्वसामान्यांसाठी आरोग्य विमा योजना खूपच लाभदायी असल्याचे सांगितले. 

यावेळी श्रीकांत वैद्य यांनी दिवंगत करसल्लागार अरूअप्पा जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. अप्पा हे आमचे सर्वांचेच चांगले मित्र होते. श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष, र. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष आणि करसल्लागार संघटनेचे ते काम करत होते. त्यांनी सर्व करसल्लागारांना एकत्र आणले, असे वैद्य म्हणाले.

यावेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ करसल्लागार श्रीकांत वैद्य यांनी सीए पित्रे यांचा सत्कार केला. तसेच करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ यांनी सीए योगेश प्रसादे यांचा सन्मान केला. सीए वरद पंडित यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रमाकांत पाथरे यांनी आभार मानले. यावेळी सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, करसल्लागार संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बेर्डे, खजिनदार नीलेश भिंगार्डे, राजन संसारे आदी उपस्थित होते. या क्षेत्रातील श्रोतेवर्ग यावेळी उपस्थित होता.