होमपेज › Konkan › रेल्वे क्रॉसिंगवर इस्रो करणार लोकांना सावध!

रेल्वे क्रॉसिंगवर इस्रो करणार लोकांना सावध!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रेल्वेकडून वारंवार आवाहने, जनजागृती करुनही रेल्वे मार्ग ओलांडताना वाहनचालक, पादचारी पुरेशी काळजी घेत नसल्याने वरचेवर घडणार्‍या दुर्घटनांबाबत आपण नेहमीच वाचत असतो. अलीकडे तर कानाला मोबाईल हेडफोन लावून संभाषण करताना तसेच संगीत ऐकताना रेल्वे अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत.

मनुष्यविरहित रेल्वे कॉसिंगवरही रेल्वे दुर्घटना वाढू लागल्याने आता रेल्वेने अशा दुर्घटना टाळण्यासाठी इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ची मदत घेतली आहे. यामुळे रेल्वे कॉसिंगवरील अपघातांना आळा बसण्यासह रेल्वे गाड्यांना अचूकपणे ट्रॅक करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

रेल्वेसाठी विकसित करण्यात आलेली ही यंत्रणा उपग्रहावर आधारित काम करणार आहे. यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर एक  ‘हुटर’ म्हणजेेच विशेषत:  सिग्नलसारख्या यंत्रणांमध्ये वापरला जाणारा सायरन बसवण्यात येणार आहे. या हुटरमध्ये एक आयसी (इंटिग्रेटेड सर्किट) बसवण्यात येणार आहे.

ही यंत्रणा देशभरातील 10 हजार रेल्वे  इंजिनांमध्ये बसवण्यात येत आहे. यामुळे रेल्वे  गाडी  क्रॉसिंगपासून 500 मीटर अंतरावर आल्यानंतर कॉसिंगच्या ठिकाणी बसवलेला सायरन वाहनधारक तसेच रेल्वे रुळ ओलांडणार्‍या लोकांना सतर्क करणार आहे. जसजशी रेल्वे गाडी क्रॉसिंगच्या जवळ येत जाईल तसतसा हा सायरन जोरजोरात आवाज करेल. इस्रोच्या मदतीने रेल्वेकडून करण्यात येणार्‍या या नव्या  ‘हायटेक’ उपाययोजनेमुळे रेल्वे कॉसिंगवरील अपघातांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. 

याचबरोबर रेल्वे इंजिनमध्येही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याने तुम्हाला हवी असलेली एखादी रेल्वे गाडी  नेमकी कुठे आली आहे, याचा अचून वेध घेणे शक्य होणार आहे. सध्या त्या-त्या स्थानकांवरुन रेल्वे गाडी पार झाली की, तेथील कर्मचारी वेळ अपडेट करीत असल्याने रेल्वे गाडी ट्रॅक करण्यात बर्‍याचदा अचूकता नसते, असे आढळून आले आहे. त्यामुळे आता ‘इस्रो’च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे  देशातील कोणत्या रेल्वे मार्गावर कोणती रेल्वे गाडी नेमकी कुठपर्यंत आली आहे, हे  प्रवाशांना अगदी अचूकपणे तपासता येणे शक्य होणार आहे. तसेच यापुढे गाडी चुकण्याची शक्यताही टाळता येण्यासह एखादी गाडी नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत असल्यास वेळेआधी स्थानकावर पोहचून ताटकळतही बसावे लागणार नाही.