Mon, Nov 19, 2018 12:39होमपेज › Konkan › रत्नागिरी : मांडवी समुद्रकिनारी सापडलेल्या तरुणाचा खून?

रत्नागिरी : मांडवी समुद्रकिनारी सापडलेल्या तरुणाचा खून?

Published On: Aug 17 2018 8:52PM | Last Updated: Aug 17 2018 8:44PMरत्नागिरी : वार्ताहर

मुंबईतील समीर वणु याची मांडवीत हत्याच केल्याच्या तपासापर्यंत पोलिस यंत्रणा पोहचली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. प्रेमप्रकरणातून समीरचा काटा काढण्यात आला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

महिनाभरापूर्वी मुंबई गोवंडी येथे दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर समीरसह त्याच्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई न्यायालयात समीरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर तो रत्नागिरीत भावाकडे आला होता. लोकेशन मिळू नये यासाठी त्याने मोबाईल वापरणेही टाळले होते. 

११ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास समीर व त्याचा मुंबईतला भाऊ दोघेही मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडले. तू पुढे जा मी रेल्वेस्टेशनला येतो असे समीरने आपल्या छोट्या भावाला सांगितले. समीरसोबत कपड्याची बॅग होती. रात्री १२.३० पर्यंत समीर रेल्वेस्थानकात न पोहोचल्याने दुसरा भाऊ रेल्वेने मुंबईला पोहोचला. 

सोमवारी सकाळी समीरचा मृतदेह मांडवी नजीकच्या समुद्रकिनारी आढळून आला होता. चेहर्‍याचा पूर्ण भाग नष्ट झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशी अंती तो समीर वणुचा असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी समीरचे सर्व भाऊ रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यातील एकाने आपल्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. सर्व नातेवाईक पोलिस स्थानकापर्यंत पोहोचले होते. पोलिसांनीही चौकशी सुरू केली. यातून हा खूनच असल्याच्या तपासापर्यंत पोलिस यंत्रणा पोहचली आहे.