Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Konkan › मुलांच्या हातात मोबाईलऐवजी ‘विटू- दांडू’ द्या! 

मुलांच्या हातात मोबाईलऐवजी ‘विटू- दांडू’ द्या! 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 10:58PM

बुकमार्क करा

माणगांव ः वार्ताहर

अलिकडे वाचन संस्कृती  दुर्मिळ होत चालली आहे. मुले मोबाईलमध्ये गुंतली जात असून ही मुलांसाठी धोक्याची घंटी आहे. पालकांनी सजगतेने मुलांना वाचन संस्कृतीकडे वळवून खो-खो, विठू दांडू सारखे जुुने खेळ त्यांना खेळायला द्यावेत, असे आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी  केले. यावेळी पद्मश्री कर्णिक यांच्याशी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधला. 

आंबेरी डी.डी. पॉईंट येथे कोमसापचे  डी.डी. देसाई स्मृती पाचवे जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन सोमवारी पार पडले. या कार्यक्रमात पद्मश्री कर्णिक बोलत होते. व्यासपीठावर कोमसापचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई,  बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष मानस नाईक, जि.प. सदस्य राजू कविटकर, नमिता कीर, रमेश कीर, अरूण नेरूरकर, विजय पालकर, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते. 

मधु मंगेश कर्णिक म्हणाले, साहित्य संमेलन म्हणजे काय हे मुलांना समजणे   गरजेचे  आहे. पालकांनी आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच लिखानाची, वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. रणजित देसाई म्हणाले, डी.डी. पॉईंट येथे हे पहिलेच साहित्य संमेलन झाले. यापुढे या ठिकाणी  मुलांचे वेगवेगळे उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा आहे. मुलांच्या या उपक्रमासाठी याठिकाणी आपण स्मृतिभवन साकारणार तसेच साहित्याशी निगडीत मोफत कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मानस नाईक याने मुलांनी मोबाईलपासून दूर राहून अभ्यासाकडे अधिक  लक्ष द्यावा  असे आवाहन केले.  चिन्मय कदम, तन्वी परब, प्रणव परब, सुजन वाटवे या मुलांनी बालसंमेलनात मनोगते व्यक्‍त केले.  वाडोस व हळदीचे नेरूर केंद्राने लक्षवेधी अशी साहित्य दिंडी काढली. या बालसाहित्य संमेलनात  माणगांव विद्यालय कुणकेरी-घोणसरी, कांदुळी, मांडखोल, हळदीचे नेरूर, वाडोस आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.